चहापेक्षा केटली गरम : स्वीय सहायकाला सोबत नेण्यास विरोध केल्याचे कारण
औरंगाबाद : मंत्री, लोकप्रतिनिधींपेक्षा त्यांचे स्वीय सहायक म्हणजे ‘चहापेक्षा केटली गरम’ असेच असतात, असे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने केलेल्या वक्तव्याचा अनुभव शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आला. स्वीय सहायकाला जिल्हा आढावा बैठकीत जाताना पोलीस उपनिरीक्षकांनी रोखल्याने संतप्त झालेल्या शिवसेना आमदार संयज शिरसाट यांनी उपनिरीक्षकासोबत हुज्जत घातली. प्रत्यक्षदर्शीच्या नजरेतून हा प्रकार सुटला नाही. त्यामुळे पोलिसांनी शिवसेनेच्या नेत्यांच्या कानावर हा सगळा प्रकार टाकला.
आ. शिरसाट हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या जिल्हा आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १ वाजता पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांचे स्वीय सहायकदेखील होते. सुरक्षेच्या कारणास्तव अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना बैठकीला जाण्याची परवानगी होती. त्यामुळे आ. शिरसाट यांच्यासोबत असलेल्या स्वीय सहायकाला पोलीस उपनिरीक्षकाने प्रवेशद्वारासमोर रोखून थोड्या वेळाने आत सोडतो, असे सांगितले. यावरून संतापलेल्या आ. शिरसाट यांनी पोलीस उपनिरीक्षकाच्या हाताला हिसका देत सुरक्षा यंत्रणा भेदून स्वीय सहायकाला आत नेले. माध्यम प्रतिनिधी व कॅमेरामनकडे पास असतानादेखील त्यांना बैठकीकडे जाऊ दिले नाही. पोलीस माध्यम प्रतिनिधींना हुसकावून लावत होते. मात्र, आमदारांनी स्वीय सहायकाला सोबत नेऊनही पोलिसांनी काहीही केले नाही.