औरंगाबाद : प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर रुजू व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केले. मात्र, विलिनीकरण झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे म्हणत जिल्ह्यातील एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत.
शरद पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांची एसटी कर्मचारी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत सोमवारी बैठक झाली. यात कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणतेही कारवाई होणार नाही, असे आश्वासन परिवहन मंत्र्यांनी दिले. तसेच कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांसंदर्भात वाहतूक सुरळीत झाल्यानंतर सकारात्मक विचार केला जाईल, असेही सांगण्यात आले. शरद पवार व अनिल परब यांच्या आवाहन आणि आश्वासनानंतरही जोपर्यंत एसटीचे शासनात विलिनीकरण होणार नाही, तोपर्यंत आम्ही कामावर जाणार नसल्याचे आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. आमची इतर कोणतीही मागणी नसून, एसटी प्रशासनाने कितीही कारवाया केल्या, तरी मागे हटणार नसल्याचेही कर्मचारी म्हणाले.
वकिलांबरोबर चर्चेअंती निर्णयएसटी कर्मचाऱ्यांसोबत उभे राहणारे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्याशी याबाबत चर्चा करून पुढील रणनिती ठरविण्यात येणार असल्याची माहिती आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी दिली.
अनेकजण परत येत आहेतदरम्यान, कामावर हजर झालेले अनेक कर्मचारी पुन्हा दुखवट्यात म्हणजे आंदाेलन, संपात परतत आहेत. रविवारी कन्नड आगारातील ३ कर्मचारी चारच दिवसात परतले. तर येत्या काही दिवसात कामावर हजर झालेले अनेक कर्मचारी दुखवट्यात परतणार असल्याची माहिती मच्छिंद्र बनकर यांनी दिली.