औरंगाबाद : ट्रक उभे करण्याच्या वादातून जाफरगेट जुना मोंढा येथे बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या व्यापाऱ्यांच्या वादाचे रूपांतर बुधवारी रात्री ८:३० वाजता जोरदार हाणामारीत झाले. या घटनेत तीन जण जखमी झाले असून, त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दोन्ही गटाच्या ११ जणांना ताब्यात घेतले.
जुना मोंढा परिसरात अजंता ट्रान्सपोर्ट आणि सिल्क शोरूमच्या शेजारी दालन आहे. ट्रान्सपोर्टचे मालवाहतूक ट्रक सतत सिल्क शोरूमसमोर उभे केले जातात. आमच्या दुकानासमोर ट्रक उभे करू नका, असे शोरूमच्या मालकांनी अनेकदा अजंता ट्रान्सपोर्टच्या चालकांना सांगितले. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे त्यांच्यात अनेकदा वाद झाले होते. बुधवारी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास अजंता ट्रान्सपोर्टचा ट्रक माल उतरविण्यासाठी आला. चालकाने हिमरू शोरूमसमोर ट्रक उभा केला.
तेव्हा शोरूम चालकाने तेथे ट्रक लावण्यास विरोध केला आणि दोन जणांना शिवीगाळ केली. ही बाब समजताच ट्रान्सपोर्टचालक आणि तेथे काम करणारे शोरूमवर चालून आले. यावेळी दोन्ही गटांत फायटर, काठ्यांनी हाणामारी झाल्याने दोन जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच क्रांती चौक पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक डॉ. जी. एच. दराडे, पो. नि. अमोल देवकर आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी लाठ्यांचा प्रसाद देत धरपकड केली. यात दोन्ही गटांच्या १० ते ११ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. या घटनेत जखमी झालेल्या तीन जणांना घाटीत पाठवले. घटनेनंतर पुन्हा कोणताही उद्रेक होऊ नये म्हणून पोलिसांनी जुना मोंढ्यात बंदोबस्त वाढविला.