लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात अवैधरीत्या वाळूचे उत्खनन व वाहतूक करताना आढळल्यास संबंधितांच्या गाड्या जप्त करण्याबरोबच त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. या कामात हयगय करणा-या अधिका-यांवरही कारवाई करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी दिले.जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा विभागीय आयुक्तांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, महसूल उपायुक्त प्रल्हाद कचरे, उपायुक्त अनंत कुंभार, उपायुक्त पारस बोथरा, उपायुक्त वर्षा ठाकुर-घुगे, रिता मेत्रेवार, सहाय्य्क आयुक्त श्रीमती सुत्रावे यांची प्रमुख उपस्थिती होती.आयुक्त भापकर म्हणाले, जिल्ह्यातील गौण खनिज वाहतुकीबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिका-यांनी याकडे वैयक्तिक लक्ष घालून वाळू चोरीचे प्रकार रोखावे. अन्य विकास कामांचा त्यांनी आढावा घेतला. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाचे अत्यंत चांगले काम झाले असून, मराठवाड्यात सर्वप्रथम हगणदारीमुक्त होण्याचा मानही जिल्ह्याला मिळाला आहे. आधार सिडींगमध्ये जिल्हा अग्रेसर आहेत. तसेच शेततळ्यांबाबत जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. पीकविमा योजनेमध्ये जिल्ह्याने भरीव कामगिरी करत संपूर्ण देशामध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. त्यामुळे या पुढील काळात जिल्ह्याचा विकास अधिक गतीने करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचा-यांनी अधिक वेगाने काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.जमिनीची सुपीकता व उत्पादकता वाढविण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शेतक-याच्या शेतात गांडुळखत, सेंद्रीय खताचे युनीट उभे करण्याची गरज आहे. यासाठी कृषी विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी. जिल्ह्यात वृक्षांचे प्रमाण वाढविण्यासाठी नर्सरीच्या माध्यमातून अधिकची रोपेनिर्मिती करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या. शासकीय वसुली, महसूल जमा व शासकीय भरणा प्रलंबित प्रकरणे, पुरवठा विभागा, महाराजस्व अभियान, कर्मचारी कल्याण अभियान योजनेचा व्यापक स्वरुपात आढावा घेतला. जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी जिल्ह्यातील विकास कामांची माहिती दिली. पुरवठा अधिकारी राजू नंदकर यांनी बैठकीचे संचलन केले. बैठकीस सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
वाळूमाफियांविरुद्ध गुन्हे दाखल करा -पुरुषोत्तम भापकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 12:44 AM