वाळूज महानगर : भरधाव व निष्काळजी दुचाकी चालवून स्वत:च्या मृत्युस व अन्य एकास गंभीर जखमी करण्यास कारणीभूत ठरलेल्या मयत दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, पंढरी गवई (रा. रांजणगाव) व अनिल वाघमारे (रा. सातारा परिसर) हे दोघे बांधकाम मजूर आहेत. २० जून रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास हे दोघे दुचाकीवरून (एम.एच.२०, एफ.वाय. २९९६) भरधाव वाळूज एमआयडीसीतील स्टरलाईट कंपनीसमोरुन जात होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पंढरी गवई याचा दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या अनिल वाघमारे याच्यावर उपचार सुरू होते. या अपघातात अनिल वाघमारे याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा स्मृतीभंश झाला असून, एक-दीड वर्ष उपचार केल्यानंतर त्याची स्मृती परत येण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांनी नातेवाइकांना सांगितले. याप्रकरणी अनिल वाघमारे याचे वडील संजय वाघमारे यांच्या तक्रारीवरून मयत दुचाकीस्वार पंढरी गवई याच्याविरुद्ध स्वत:च्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तसेच अनिल वाघमारे यास गंभीर जखमी केल्याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----------------------------