वाळूज उद्योगनगरीतील यशश्री प्रेस कॉम्पास (प्लॉट नंबर बी.४ ) या कंपनीत २८ मे रोजी सेकंड शिफ्टमध्ये कामासाठी आलेला कंत्राटी कामगार दीपक खैरनार यास सुरक्षारक्षकाने पकडले होते. अंगझडतीत त्याच्याकडे गांजाच्या तीन पुड्या मिळून आल्या. दुसऱ्या दिवशी कंपनीचे व्यवस्थापक श्रीपाद श्रीकांत व सहायक व्यवस्थापक रोहिदास गांगवे हे वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दीपक खैरनारविरुद्ध तक्रार देण्यासाठी आले होते. मात्र, ठाण्यात तक्रार न नोंदविता ते परत गेले होते. कंपनीच्या अधिकाऱ्यांचा तक्रार अर्ज पोलीस ठाण्यातच राहिल्याने पोहेकॉ. गणेश अंतरप याने परस्पररित्या कंत्राटी कामगार पुरविणाऱ्या ठेकेदाराकडे प्रकरण दाबण्यासाठी लाच मागितली होती. यानंतर पोहेकॉ. अंतरप यास लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले होते. या लाच प्रकरणात अडकल्यानंतर पोहेकॉ. अंतरप याने कपाटात ठेवलेल्या गांजाच्या दोन पुड्या पथकाने जप्त करुन एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केल्या होत्या. दरम्यान,पोलिसांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून त्या तक्रार अर्जाची साक्षांकित प्रत घेऊन त्यांना गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गांजा बाळगणारा कामगार दीपक खैरनार याच्याविरुध्द तक्रार देण्यास नकार दिल्याने दुय्यम निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी स्वत: फिर्यादी होऊन तक्रार दिली. यानंतर दीपक खैरनार याच्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------