सिल्लोड (औरंगाबाद ) : सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामदास पालोदकर यांच्याविरुद्ध गुरुवारी १८ पैकी १४ संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला. यामुळे सिल्लोड तालुक्यात खळबळ उडाली आहे. संचालकांना विश्वासात न घेणे, दुष्काळ असताना सिल्लोड तालुक्यात चारा छावण्या सुरू न करणे, मनमानी कारभार करणे आदी आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. अविश्वास प्रस्ताव आणणारे संचालक आ. अब्दुल सत्तार समर्थक आहेत.
सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जानेवारी २०१७ मध्ये झाली होती. यात १८ पैकी १७ उमेदवार काँग्रेसचे निवडून आले होते. भाजपला केवळ १ जागा ठगण भागवत यांच्या रूपाने जिंकता आली होती. ही बाजार समिती काँग्रेसच्या ताब्यात असून, बहुतेक संचालक अब्दुल सत्तार यांचे समर्थक आहेत. अजून अडीच वर्षांचा कालावधीही संपला नाही तोच रामदास पालोदकर यांच्यावर अविश्वास दाखल झाला आहे. या खेळीमुळे आता पालोदकर कुटुंब काय भूमिका घेते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.सध्या प्रभाकर पालोदकर व अब्दुल सत्तार यांचे बिनसले आहे. गेल्या २ जानेवारी २०१८ पासून प्रभाकर पालोदकर यांनी अब्दुल सत्तार यांच्याशी दुरी निर्माण केली होती. सभापती रामदास पालोदकर यांच्यासोबतही अब्दुल सत्तार यांचे १० महिन्यांपूर्वी बिनसले होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा अविश्वास दाखल झाल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.
१४ संचालक भूमिगतअविश्वास दाखल करणारे १४ संचालक भूमिगत झाले आहेत. अविश्वास आणण्यासाठी १२ संचालक असणे गरजेचे आहे.अब्दुल सत्तार यांच्याकडे १४ संचालक आहेत. ऐनवेळी दगा फटका होऊ नये म्हणून १४ संचालकांना सहलीवर पाठविण्यात आले आहे.
यांनी केला अविश्वास दाखलसंचालक दामोदर गव्हाणे, अर्जुन गाढे, नरसिंग चव्हाण, केशवराव तायडे, लीलाबाई मिसाळ, अनुसयाबाई मोरे, नंदकिशोर सहारे, सतीश ताठे, रघुनाथ मोरे, ईश्वर जाधव, हरिदास दिवटे, संजय गौर, सुनील पाटणी, रामू मिरगे या १४ संचालकांच्या या अविश्वास ठरावावर सह्या आहेत.
सभापतीसाठी ३ नावे चर्चेत : सभापती रामदास पालोदकर यांच्यावर अविश्वास पारित झाल्यास मराठा कार्ड वापरून नवीन सभापती करण्यासाठी दामोदर गव्हाणे, अर्जुन गाढे, सतीश ताठे यांची नावे चर्चेत आहेत.
सर्व आरोप खोटे; आम्हाला केवळ वापरून घेतले माझ्यावर लावलेले सर्व आरोप खोटे आहेत. १० वर्षे पालोदकर कुटुंबाला अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत वापरून घेतले. आम्ही लोकसभेत ‘नोटा’चे काम केले नाही व काँग्रेसचे काम केले. काँग्रेसतर्फे प्रभाकर पालोदकर विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे संकेत मिळाल्याने आ. अब्दुल सत्तार यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यामुळे द्वेषापोटी त्यांनी खोटे आरोप लावून अविश्वास दाखल केला आहे. आम्ही केलेल्या उपकाराची त्यांनी अशी परतफेड केली. मात्र, आगामी काळात जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल.- रामदास पालोदकर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड.