औरंगाबाद: २०११ पासून कालपर्यंत नातेवाईक तरूणानेच ती अल्पवयीन असल्यापासून तिच्यावर वारंवार अत्याचार केले. एवढेच नव्हे तर या अत्याचाराचे मोबाईलवर चित्रीकरण करून तिला ब्लॅकमेल करणा-या तरूणाविरूद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. विशेष म्हणजे आरोपी तरूण हा परभणी येथे एका शासकीय कार्यालयात कार्यरत असल्याचे समोर आले.
सॅम्युअल शशिकांत तारू (२६,रा. परभणी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी हा २०११मध्ये औरंगाबादेत शिकायला होता. पीडिता ही त्याची नातेवाईक आहे. पीडिता १६ वर्षाची असताना आरोपीने पहिल्यांदा तिला धमकावून तिच्यावर अत्याचार केला. तेव्हापासून तो तिच्यावर वारंवार अत्याचार करू लागला. काही दिवसापूर्वी त्याने तिच्यासोबतच्या अत्याचाराचे चित्रीकरण केले.
यानंतर हे चित्रीकरण करून दाखवून तो तिला धमकावू लागला. पीडितेने त्यास पोलिसांत जाण्याची धमकी दिल्यानंतर त्याने तिला लग्नाचे वचन दिले. मात्र, लग्न करण्यास तो टाळाटाळ करू लागला. दरम्यान, त्याला परभणी येथे शासकीय नोकरी लागली.नोकरी लागल्यापासून त्याने तिच्याशी संपर्क तोडला. आरोपीने लग्नाच्या प्रलोभनाने लैगिक शोषण केल्यामुळे ती आणि तिचे नातेवाईक संतप्त झाले. यानंतर तिने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार छावणी पोलिसांनी आरोपी सॅम्युअलविरूद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविला. पोलीस उपनिरीक्षक खंडागळे पुढील तपास करीत आहेत.