वाळूज महानगर : कामगारांच्या वेतनातून कपात केलेल्या पीएफ रकमेचा भरणा न करणाºया वाळूज एमआयडीसीतील टेक्निक कंपनीच्या मालकाविरुद्ध गुरुवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळूज एमआयडीसीतील टेक्निक कंपनी व्यवस्थापनाने जुलै ते नोव्हेंबरदरम्यान कंपनीतील १५ कामगारांची वेतनातून कपात केलेली १ लाख २५ हजार ४५५ रुपये व कंपनीची अंशदानाची रक्कम बँकेत भरलेली नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्यामुळे कंपनीला ही रक्कम भरण्याची नोटीस ३० आॅक्टोबरला बजावण्यात आली होती.
मात्र, या नोटिशीनंतरही कंपनीने रक्कम न भरल्यामुळे भविष्य निधी कार्यालयाकडून कंपनीचे प्रलोय सेन प्रफुलचंद्र रॉय (५४, रा. मुधियान रेसिडेन्सी, उस्मानपुरा) यांना लेखी सूचना देण्यात आली. मात्र, कंपनी व्यवस्थापनाने टाळाटाळ केल्यामुळे भविष्य निधी कार्यालयाचे प्रवर्तन अधिकारी मुक्तेश्वर व्यास यांनी तक्रार दिली आहे. यावरून कंपनीचे प्रलोय सेन रॉय यांच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.