औरंगाबाद : महापालिकेच्या हद्दीतील व्यापाऱ्यांनी एलबीटी कराला विरोध करण्याचे हत्यार उपसले आहे. दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या असहकारामुळे मनपाचा १४ कोटी रुपयांचा एलबीटी बुडाला आहे. सहनशीलतेचा अंत झाल्यामुळे मनपा आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे यांनी व्यापाऱ्यांना एलबीटी भरण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. मुदतीत करभरणा न केल्यास व्याजासह वसुलीचा इशारा नोटीसमधून देण्यात आला आहे. आयुक्तांनी नोटीसमध्ये म्हटले आहे की, जनतेस नागरी सुविधा मनपाला प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. एलबीटीबाबत व्यापाऱ्यांचे भांडण शासनासोबत आहे. एलबीटीवरील निर्णय प्रलंबित आहे. मनपाचा त्यामध्ये काहीही संबंध नाही. व्यापारी जाणीवपूर्वक शहराच्या विकासात अडथळा निर्माण करीत आहेत, असे पालिकेत मत आहे. एलबीटीबाबत शासनस्तरावर जो निर्णय होईल तो मान्य असेल. परंतु नागरिक म्हणून मनपाच्या सुविधांचा व्यापारीही लाभ घेत आहेत. दरम्यानच्या काळात मनपा निधीअभावी नागरी सुविधा पुरविण्यास असफल ठरली, तर शहरातील इतर नागरिकांप्रमाणेच व्यापाऱ्यांमध्येही असंतोष निर्माण होईल. मनपा सत्ताधाऱ्यांनीदेखील तुम्हाला एलबीटी भरण्याबाबत आवाहन केले आहे; परंतु त्याला आपण योग्य प्रतिसाद दिलेला नाही. शहराच्या विकासासाठी नाईलाजास्तव मनपाला दंडात्मक कारवाई करावी लागेल. एलबीटी कर वेळेत न भरल्यास २ टक्के व्याज दराने कर आकारणी करण्यात येईल. दरम्यान, एलबीटी अधिकारी संजय पवार म्हणाले, आजपर्यंत १० कोटी ३६ लाखांचा एलबीटी मिळाला आहे. १८ कोटींचे उत्पन्न अपेक्षित होते. गेल्या महिन्यात ८ व या महिन्यात ६ कोटींचा एलबीटी कमी मिळाला. मनपाचे हलाखीचे दिवस सुरू आहेत. विकासकामांवर, वीज बिल, कर्जफेड, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
एलबीटी भरा; अन्यथा व्याजासह वसुली
By admin | Published: June 25, 2014 1:20 AM