पैठण : जायकवाडी धरणातून शहरासाठी केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याची एक कोटी रुपयांची पाणीपट्टी पैठण नगरपरिषदेने थकविली आहे. १५ तारखेच्या आत पाणीपट्टी भरून करारनाम्याचे नूतनीकरण करा, अन्यथा गुरुवारी (दि.१८) पासून पैठण शहराला होणारा पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशारा जायकवाडी प्रशासनाने पैठण नगर परिषदेला दिला आहे.
पैठण शहरासाठी होणाऱ्या पाणीपुरवठ्यात काही तासांची कपात करून जायकवाडी प्रशासनाने सध्या सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुख्याधिकाऱ्यांना बजावलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, पैठण शहर पाणीपुरवठा योजनेच्या करारनाम्याची मुदत संपलेली आहे. या योजनेचे पाणी मापक यंत्र हे कार्यान्वित करण्यात आलेले नाही. वारंवार पाठपुरावा व मागणी करूनसुद्धा डिसेबर-२०२० पर्यंत १०७.०९ लाख एवढी रक्कम थकीत आहे. त्यामुळे पाणीपट्टीची थकबाकी १५ मार्चपर्यंत भरून तत्काळ करारनाम्याच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव कार्यालयाला सादर करावा तसेच पाणीमापक यंत्र कार्यान्वित करूनच पाणी उपसा करण्यात यावा. अशी सूचना करण्यात आली. जर असे झाले नाही तर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पैठण शहराचा पाणी पुरवठा यापुढे कुठलीही पूर्वसूचना न देता खंडित करून कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
भर उन्हाळ्यात पाणीपुरवठा खंडीत करण्याचा इशारा देण्यात आल्याने पैठण शहरात खळबळ उडाली आहे.