लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सायंकाळी शहनाईच्या स्वराने गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमीतील वातावरण मंगलमय होऊन गेले होते. शहनाई ऐकताना कानसेनची ब्रह्मानंदी टाळी लागली होती. एक कर्णमधुर सुरांची सायंकाळ अनुभवल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहºयावर दिसून येत होता.प्रसंग होता, स.भु. कला व वाणिज्य महाविद्यालय आणि शहनाई संगीत अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संगीत महोत्सवाचा. भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान स्मृतिनिमित्त महोत्सवाला शनिवारी सायंकाळी सुरुवात झाली. शहनाईवादक कल्याण अपार यांचे शिष्य अनिल तोडकर, केदार जाधव, अर्जुन बनकर यांनी राग हंसध्वनी तीन तालातील रचना सादर करून सर्वांना प्रसन्न केले. अतिशय साधा, पण तितकाच प्रसन्न राग, ‘बिलावल’ थाटातला राग. बिलावल थाट म्हणजे सगळे स्वर शुद्ध असा राग. या शिष्यांनी शहनाईवादन करून सर्व वातावरण मंगलमय बनविले. या भारावलेल्या वातावरणात मराठवाड्यातील शहनाईचे ‘अपार’ सूर असलेले कल्याण अपार व बासरीवादक पं. राजेंद्र कुलकर्णी यांनी रंगमंचचा ताबा घेतला. त्यांनी राग ‘जोग’ने आपल्या जुगलबंदीला सुरुवात केली. त्यांच्या जुगलबंदीने रसिकांना खिळवून ठेवले. त्यानंतर त्यांनी मत्तताल एक रचना सादर करून रसिकांवर मोहिनी घातली. त्यांना शोण पाटील यांनी तोडीसतोड तबल्याची साथ दिली. प्रारंभी, ज्येष्ठ गायक पं. नाथराव नेरळकर, प्राचार्य डॉ. जे. एस. खैरनार, उपप्राचार्य सोमाजी ठोंबरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. शहनाईवादकांचा परिचय योगिनी जोशी यांनी करून दिला. प्रा. डॉ.नागेश अंकुश यांनी सूत्रसंचालन केले. यशस्वितेसाठी संगीत विभागप्रमुख डॉ. संजय मोहड, मेधा लखपती, मंगेश कुलकर्णी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
शहनाई-बासरीच्या जुगलबंदीने कानसेन झाले तृप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 1:02 AM