सोयगाव : नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी १५ मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा निवडणूक आयोगाचा कार्यक्रम आदेशाद्वारे रद्द करण्यात आले आहे. या मतदार यादीला मुदत न दिल्याने सोयगाव नगरपंचायत निवडणूक दीर्घ कालावधीसाठी पुढे ढकलल्याचे संकेत निवडणूक विभागाकडून देण्यात आले आहे. त्यामुळे सोयगाव नगर पंचायतीला आता जूनचा मुहूर्त लागू शकतो, असे सूत्रांनी सांगितले.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे सोयगाव नगर पंचायतीची ८ मार्चला जाहीर होणारी अंतिम मतदार यादीची मुदतवाढ करून १५ मार्च प्रसिद्ध करण्यात येणार होती. परंतु अद्यापही कोरोना संसर्ग कमी झालेला नाही. या अंतिम मतदार यादीला मुदतवाढ देण्यात आली नाही. यासंदर्भात निवडणूक आयोगाला कळविण्यात यावा, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने रविवारी पारित केले आहे.
सोमवारी नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार नाही. या यादीला मात्र पुढील मुदतही न दिल्याने राज्य निवडणूक आयोगाकडून या निवडणूक कार्यक्रमाला तूर्तास स्थगिती दिली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे इच्छुकांचा मोठा हिरमोड झाला असून सोयगाव नगर पंचायतीची निवडणूक दीर्घ काळासाठी लांबणीवर गेली आहे.