औरंगाबाद : महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या प्रभाग आराखड्यावर ३२४ नागरिकांनी आक्षेप घेतला होता. त्यामध्ये १५ प्रमुख दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. अंतिम आराखडा आयोगाकडे सादर करण्यात आल्याची माहिती मनपाच्या निवडणूक विभागाने दिली.
महापालिका निवडणुकीसाठी १२६ वॉर्डांचे ४२ प्रभाग करण्यात आले आहेत. प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा व हद्दींचा नकाशा २ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आला. १६ जूनपर्यंत हरकती-सूचना मागविण्यात आल्या. २२ जून रोजी औरंगाबादेत मौलाना आझाद संशोधन केंद्रात सुनावणी घेण्यात आली. सुनावणीसाठी नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती केली होती. त्यांनी ३२४ आक्षेपांची सुनावणी घेतली. प्रभागांच्या हद्दींची स्थळ पाहणी करून त्याचा अहवाल सादर करा, असे निर्देश हर्डीकर यांनी दिले होते. त्यानुसार पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी केली. दोनच प्रभागांच्या हद्दींबद्दल तसे आक्षेप होते. त्यामुळे त्या प्रभागांची तर स्थळ पाहणी करण्यात आलीच; पण त्याचबरोबर सर्व प्रभागांच्या हद्दी स्थळ पाहणी करून तपासून घेण्यात आल्या. काही चुका तर झालेल्या नाहीत ना, याची खातरजमा करण्यात आली आणि त्याचा अहवाल हर्डीकर यांना सादर करण्यात आला. हर्डीकर यांनी प्रभाग आराखड्यात एकूण १५ दुरुस्त्या सुचविल्या. त्यानुसार मनपाच्या निवडणूक विभागाने दुरुस्त्या करूनही दिल्या. आता हा अंतिम प्रभाग आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार याद्या तयार करण्याचे काम प्राथमिक स्वरूपात सुरू करण्यात आले आहे. यंदा मनपा निवडणूक प्रभागाच्या अनुषंगाने होत असल्याने प्रत्येक प्रभागासाठी एकच मतदार यादी तयार करावी लागणार आहे. यामध्ये मनपाच्या निवडणूक विभागाला बरीच मेहनत घ्यावी लागेल. एका प्रभागाचे मतदार दुसऱ्या प्रभागात जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागणार आहे.