छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ५ मार्च रोजी शहरातील सभा निश्चित झाली आहे. भाजपचा खडकेश्वरच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा घेण्याचे निश्चित झाले आहे. शाह व अन्य व्हीआयपींच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे मैदान योग्य नसल्याचे पोलिसांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळविले होते, परंतु आजवर देशातील व राज्यातील प्रमुख नेत्यांच्या सभा सांस्कृतिक मंडळावरच झाल्यामुळे तेथेच शाह यांची सभा व्हावी, असा आग्रह भाजपकडून होता. अखेर पोलिसांकडून परवानगी मिळाल्यामुळे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या हस्ते सांस्कृतिक मंडळावर सभामंडप टाकण्यासाठी स्तंभपूजन करण्यात आले. राजकीय सभांची मोठी पार्श्वभूमी असलेल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरच सभा घेण्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा हट्ट होता. सभेच्या तयारीचा आढावा व जागा पाहणीसाठी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी मैदानाची पाहणी केली आहे.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी स्तंभपूजनप्रसंगी शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी सांगितले, ५ राेजी सायं. ५ वा. सभेची वेळ आहे. सभेत जास्तीतजास्त दोन ते तीन नेत्यांची भाषणे होतील. सुमारे ४० मिनिटांचे भाषण शाह यांचे असेल. ८:३० वा. ते विमानाने रवाना होतील. यावेळी प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, जालिंदर शेंडगे, राजेंद्र साबळे, राजू शिंदे, जगदीश सिद्ध, अनिल मकरिये, लक्ष्मीकांत थेटे, सागर पाले, महेश माळवतकर आदींची उपस्थिती होती.
पोलिसांचा लागणार कस....शाह हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे अतिमहत्त्वाचे सुरक्षित व्यक्ती आहेत. त्यांना झेड प्लस (विशेष) दर्जाची सुरक्षा आहे. सीआरपीएफवर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असते. यात ५५ अद्ययावत शस्त्रधारी जवानांचा समावेश असतो. ज्यात १० पेक्षा अधिक एनएसजी कमांडो असतात. पंतप्रधानांच्या बंदोबस्तातील जवानांकडे असलेली ब्रीफकेस बॅलिस्टिक शील्ड शाह यांच्या बंदोबस्तात असते. अन्य तपास व गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी असतात. त्यांच्या ताफ्यात वाहनांची संख्या अधिक असेल, शिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ४ व्हीआयपी उपस्थित असतील. जवळपास १४ ते १५ आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा आहे. सुरक्षेसाठीची वाहनांची संख्या, जवानांची संख्या या सगळ्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांसमोर बंदोबस्ताचे आव्हान असेल.