औरंगाबाद : मराठवाडा विकास मंडळाच्या अध्यक्षपदी अखेर भागवत कराड यांची नियुक्ती करण्यात आली. भागवत कराड हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष असून औरंगाबाद महानगरपालिकेचे महापौरपद त्यांनी भूषवले आहे.
मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी १९९४ यावर्षी राष्ट्रपतींच्या आदेशावरून वैधानिक विकास मंडळाची स्थापना करण्यात आली. मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे पहिले अध्यक्ष होण्याचा बहुमान कमलकिशोर कदम यांना गेला. त्यानंतर युतीच्या राज्यात दिवाकर रावते, प्रताप बांगर यांनी अध्यक्षपद भूषविले. मधुकरराव चव्हाण यांनी १९९९ ते २००९ अशी दहा वर्षे मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम बघितले.
( ना अध्यक्ष ना निधी; मराठवाडा विकास मंडळाची दयनीय स्थिती )
त्यानंतर विभागीय आयुक्तांकडेच या पदाचा प्रभार राहिला. मागील चार वर्षांपासून अध्यक्षपद सेना-भाजपच्या राजकारणात अडकले. भाजपकडून डॉ.भागवत कराड, संजय केणेकर, तर शिवसेनेकडून राज्यमंत्री अर्जुन खोतकर आदींच्या नावाची चर्चा होत राहिल्या. अखेरीस डॉ.कराड यांनी यात बाजी मारली.
मराठवाड्यासारख्या मागास भागाचा अनुशेष दूर करणे, हक्काचे पाणी मिळवून देणे, तसेच विविध विकासकामांबाबत राज्यपालांना शिफारशी करून पदरात निधीचे माप पाडून घेणे असे अनेक महत्वपूर्ण कामे मराठवाडा विकास मंडळाच्या अध्यक्षाकडून अपेक्षित आहेत. भागवत कराड यांच्या नियुक्तीने हा अनुशेष दूर होईल अशा आशा मराठवाड्याच्या नागरिकांना आहेत.