छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने माजी खासदार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना पुन्हा उमेदवारी घोषित केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक्स या सोशल हँडलवर शिवसेनेच्या उमेदवारांची यादी ट्विट केली. खैरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा पत्ता कट झाला आहे.
औरंगाबाद( छत्रपती संभाजीनगर )लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने उमेदवारी मिळविण्यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यात रस्सीखेच सुरू होती. खैरे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत आमदार दानवे यांना मिळताच त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही नेत्यातील वाद थेट मातोश्रीपर्यंत गेला होता.
पक्षप्रमुखांनीही दानवे आणि खैरे यांना एकत्र बसून निर्णय घेण्याचे सांगितले होते. यानंतरही दानवे यांनी उमेदवारीवरील दावा मागे घेतला नव्हता. एवढेच नव्हे तर शिंदे गटाकडून आपल्याला ऑफर असल्याचे दानवे यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघात शिवसेनेचा उमेदवार कोण असेल याविषयी चर्चा मागील पंधरा दिवसापासून रंगली होती .आज शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली. यात चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.