औरंगाबाद : गारखेडा परिसरातील शंभूनगर येथील नाल्यात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू होते. या बांधकामामुळे नाल्यातील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बंद होण्याची भीती परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली होती. या अनधिकृत बांधकामाबाबत नागरिकांनी मनपाच्या अतिक्रमण हटाव विभागाकडे तक्रार केली होती. मात्र, मनपाने दखल घेतली नाही. नागरिकांनी ‘लोकमत’कडे धाव घेतली. ‘लोकमत’ने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केल्यानंतर सोमवारी कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
पावसाळ्यात नाल्यांचे पाणी नागरिकांच्या घरांमध्ये जाणार नाही, यासाठी मनपा प्रशासनाकडून व्यापक प्रमाणात नालेसफाई करण्यात आली. दरवर्षी नालेसफाईवर कंत्राटी पद्धतीने होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च बंद करून मनपाकडून साफसफाई करण्यात आली. गारखेडा भागातील शंभूनगर येथे थेट नाल्यात अतिक्रमण करून कॉलम टाकण्याचे काम लॉकडाऊनमध्ये सुरू झाले. २० बाय ६० चौरस फूट एवढ्या मोठ्या क्षेत्रफळात बांधकाम सुरू होते. अतिक्रमण करणाऱ्यांनी जवळपास आठ कॉलमही उभारले. महापालिकेच्या भूमिगत गटार योजनेतील मेन होलला लागूनच हे बांधकाम होते. नाल्यातच हे बांधकाम आहे का याची खात्री मनपाने केली. त्यानंतर दुपारी अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले. ही कारवाई पदनिर्देशित अधिकारी आर. एस. राचतवार, सविता साेनवणे, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद, आदींच्या पथकाने केली. त्याचप्रमाणे नेहरू भवन, आमखास मैदान येथीलही अतिक्रमणे मनपाकडून काढण्यात आली.