कळंब : तालुक्यातील पिंपळगाव (डो़) येथील सहा वर्षीय बालकाच्या खून प्रकरणात कळंब पोलिसांनी सहा जणांविरूध्द नरबळी आणि अनिष्ठ प्रथा व जादुटोणा प्रतिबंध कायद्याचे कलम वाढविले आहे़ दरम्यान, या प्रकरणातील तिघांची पोलीस कोठडी संपल्यानंतर मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते़ न्यायालयाने तिघांनाही दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे़तालुक्यातील पिंपळगाव (डो़) येथील कृष्णा इंगोले या सहा वर्षीय बालकाचा खून करण्यात आला होता़ या प्रकरणाच्या तपासात हा खून नरबळीचा प्रकार असल्याचे समोर आले आहे़ या प्रकरणात पोलिसांनी उत्तम इंगोले, उर्मिला इंगोले, राहूल उर्फ लखन चुडावकर, द्रोपदी उर्फ लक्ष्मी पौळ, साहेबराव इंगोले व सुवर्णा भडाळे या सहा जणांना अटक केली आहे़ यातील द्रोपदी पौळ, साहेबराव इंगोले व सुवर्णा भडाळे यांची मंगळवारी पोलीस कोठडी संपली होती़ त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना वाढीव दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ या प्रकरणात पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि अनिष्ट प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ कलम ३ (२) या कलमाची वाढ केली आहे़ या प्रकरणातील पोलिसांच्या पुढील तपासाकडे तालुक्याचे नव्हे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़
..अखेर नरबळीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2017 11:39 PM