सिल्लोड : महावितरणच्या कन्नड विभागीय कार्यालयाचे विभाजन करण्यात आले असून, सिल्लोडला स्वतंत्र महावितरणचे विभागीय कार्यालय मंजूर करण्यात आले आहे. सिल्लोड, सोयगावमधील शेतकरी व वीज ग्राहकांना कन्नड येथे जाणे गैरसोयीचे ठरत होते. यामुळे महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला होता.
शासनाच्या निर्णयामुळे महावितरणच्या कन्नड विभागीय कार्यालयाचे विभाजन करून कन्नड व सिल्लोड असे दोन स्वतंत्र विभाग करण्यात आले आहेत. सिल्लोड विभागीय कार्यालयांतर्गत आता सिल्लोड १, सिल्लोड २ व सोयगाव असे तीन उपविभागीय कार्यालये असतील. कन्नड विभागामध्ये कन्नड, वैजापूर, पिशोर हे तीन उपविभाग असतील, अशी माहिती वीज वितरण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
७ ऑक्टोबर २०२० रोजी मुंबई येथे महावितरणच्या मुख्यालयात आयोजित बैठकीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी महावितरणचे विभागीय कार्यालय कन्नड येथे असल्याने सिल्लोड व सोयगावमधील वीज ग्राहकांना ते गैरसोयीचे ठरत असल्याचे सांगून सिल्लोडला नवीन कार्यालय सुरू करण्याची मागणी केली होती. यावर त्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना डॉ. नितीन राऊत यांनी सहव्यवस्थापकीय संचालक, औरंगाबाद यांना दिल्या होत्या. यानंतर या प्रस्तावाला ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंजुरी दिली.