औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून शहर पोलिसांनी अवैधपणे नशेच्या गोळ्या विकणाऱ्यांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. त्या मोहिमेनुसारच बेगमपुरा, हर्सूल आणि सिटी चौक पोलिसांच्या संयुक्त पथकाने कौसर कॉलनी येथे नशेच्या गोळ्या विकणाऱ्यांच्या चार जणांना बेड्या ठोकल्या (Mastermind of drug selling cought in Aurangabad) आहेत. ही कारवाई गुरुवारी रात्री साडेसात वाजता करण्यात आली. यात अटक केलेल्या चार आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
पोलीस उपायुक्त उज्ज्वला वनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेगमपुरा पोलिसाच्या कोठडीत असलेला आरोपी शेख नय्यद शेख नईम याच्याकडे नशेच्या गोळ्याचा पुरवठा कोण करते, याबाबत त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे कौसर कॉलनी येथील नशेच्या गोळ्याच्या साठ्यावर तीन ठाण्यांच्या पोलिसांच्या पथकाने छापा मारला. त्यात कोणत्याही डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शन नसताना निट्रोसन १० नावाच्या २०१ गोळ्या सापडल्या. तसेच एक दुचाकी आणि ९ मोबाईल हॅडसेट पोलिसांनी जप्त केले. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ४८ हजार ७०० रुपये आहे.
या छाप्यात पोलिसांनी शेख मोबीन शेख रफीक, फरीद कुरैशी बाबा कुरैशी ऊर्फ अदील चाकू, शेख अस्लम शेख मुशीर आणि नजीब शेख रफिक शेख यांना अटक करण्यात आली. या चौघांना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या कारवाईत बेगमपुराचे निरीक्षक प्रशांत पोतदार, उपनिरीक्षक विशाल बोडखे, हर्सूलचे निरीक्षक अमोल देवकर, उपनिरीक्षक शेख, सिटी चौकचे दुय्यम निरीक्षक अशोक भंडारे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. या प्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक विशाल बोडखे करीत आहेत. २३ नोव्हेंबर रोजी केलेल्या कारवाईनंतर ही नशेच्या विरोधात सलग दुसरी कारवाई करण्यात आली आहे.
नशेच्या गोळ्यांविरोधात अभियाननशेच्या गोळ्यांच्या विरोधात पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या आदेशाने जोरदार अभियान राबविण्यात येत आहे. पोलीस ठाण्याच्या प्रमुखांसह गुन्हे शाखाही नशेच्या गोळ्या विकणाऱ्यांच्या मागावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.