औरंगाबाद : शासनाने शुक्रवारी शिक्षणाधिकारी पदासाठी नियमित पदोन्नतीची यादी जाहीर केली. त्यानुसार बीड येथे कार्यरत उपशिक्षणा-धिकारी एस. पी. जैस्वाल यांना औरंगाबादजिल्हा परिषद प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारीपदी नियुक्ती मिळाली. तब्बल ११ महिन्यांपासून सुरू असलेला प्रभारी शिक्षणाधिकार्यांचा पाठशिवणीचा खेळ आता थांबेल व रखडलेले प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा आहे.
शालेय शिक्षण विभागाने अखेर शुक्रवारी सेवा ज्येष्ठतेनुसार शिक्षणाधिकारी व तत्सम पदाच्या पदोन्नत्या जाहीर केल्या. यामध्ये बीड येथे कार्यरत एस. पी. जैस्वाल यांची प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी पदी, तर जालना येथे कार्यरत उपशिक्षणाधिकारी तथा प्रभारी शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांना उपसंचालक कार्यालयात सहायक शिक्षण संचालक म्हणून पदोन्नती मिळाली आहे. जैस्वाल यांनी यापूर्वी औरंगाबाद जिल्हा परिषदेत उपशिक्षणाधिकारी तसेच औरंगपुरा येथील जि. प. केंद्रीय प्रशालेत मुख्याध्यापक म्हणून काम केले आहे. सन २०१३ मध्ये शासनाने एम. के. देशमुख व एस. पी. जैस्वाल यांना शिक्षणाधिकारीपदावर तात्पुरत्या स्वरुपाची (अभावित) पदोन्नती दिली होती. त्यानुसार बीड येथे शिक्षणाधिकारी म्हणून देशमुख यांनी, तर जैस्वाल यांनी नंदूरबार येथे काही काळ सेवा बजावली होती. ११ महिन्यांचा सेवाकाळ पूर्ण के ल्यानंतर पुन्हा या दोघांनाही मूळ पदावर नियुक्त करण्यात आले होते.
माध्यमिक विभाग वार्यावरमाध्यमिक शिक्षण विभागाला पूर्णवेळ शिक्षणाधिकारी नाही. उपशिक्षणाधिकारी गजानन सुसर हेच सध्या माध्यमिक व प्राथमिक, अशा दोन्ही शिक्षणाधिकार्यांचा अतिरिक्त कार्यभार सांभाळतात. शासनाने आज जाहीर केलेल्या महाराष्ट्र शिक्षण सेवा गट- ‘अ’ मधील उपशिक्षणाधिकार्यांना शिक्षणाधिकारीपदावर पदोन्नती जाहीर केली. त्या यादीत माध्यमिक विभागाला शिक्षणाधिकारी देण्यात आलेला नाही.