लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागातील जिल्हा काम वाटप समितीवर सुशिक्षित बेरोजगार अभियंता सदस्य म्हणून घेण्याच्या परंपरेला फाटा देत अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांना सदस्य निवडीसाठी जाहीर केलेला निवडणूक कार्यक्रम मागे घ्यावा लागला.अभियंता संघटनांच्या विरोधामुळे त्यांनी निवडणुका रद्द करीत सुशील खेडकर, विजय फुलारे यांना औरंगाबाद, तर गौरव साळवे यांची जालना समिती सदस्यपदी नियुक्ती केली. याप्रकरणी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून सा.बां. विभागाचे लक्ष वेधत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या मागणीला वाचा फोडली होती. महाराष्ट्र अभियंता सेना, महाराष्ट्र बहुजन इंजिनिअर्स असोसिएशन, महाराष्ट्र इंजिनिअर्स अॅण्ड कॉन्ट्रॅक्टर, सर विश्वेश्वरय्या इंजिनिअर्स असोसिएशन, क्रांती संघटनेने निवडणूक रद्द करण्याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली होती. गेल्या वर्षी यंदाच्या सदस्य निवडीचा शासन निर्णय क्र.सीएटी-१०९८, प्रकरण क्र. २४१, इ-२, २९ डिसेंबर १९९८ नुसार झाल्याचा निर्णय अभियंता फेडरेशनने दिला होता; परंतु त्या सदस्याला समितीवर घेतले नाही. पूर्वीची प्रचलित पद्धत रद्द करून पहिल्यांदाच निवडणुका घेण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.जिल्हा काम वाटप समिती एक सुशिक्षित बेरोजगार अभियंता सदस्य म्हणून नियुक्त करण्यासाठी अभियंत्यांच्या विविध संघटनांमध्ये एकमत होत नसल्यामुळे निवडणूक घेण्याचा निर्णय बांधकाम विभागाने जाहीर केला होता.
अखेर पीडब्ल्यूडी काम वाटप समितीची निवडणूक रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 12:41 AM