लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे खातेदार असलेल्या एक हजार ७७ शेतक-यांची कर्जमाफीची पहिली यादी गुरुवारी बँकेच्या मुख्य शाखेला प्राप्त झाली आहे. पडताळणी झाल्यावर कर्जमाफीची आठ कोटी २८ लाखांची रक्कम या शेतक-यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात येणार आहे. तसेच बँक आॅफ महाराष्ट्रला पहिल्या यादीतील पात्र शेतक-यांसाठी सुमारे ३० कोटी रुपये प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीस पात्र शेतक-यांच्या ग्रीन याद्या आता थेट बँकांकडे येण्यास सुरुवात झाली आहे. जालना जिल्हा ग्रामीण बँकेच्या २६ शाखांमधील एक हजार ७७ शेतकºयांची पहिली यादी प्राप्त झाली आहे. या शेतक-यांचे एकूण ८ कोटी २८ लाख ९१ हजार ३५७ रुपयांचे कर्ज माफ केले जाणार आहे. कर्जमाफीची रक्कमही बँकेला प्राप्त झाली असून, आवश्यक पडताळणी होताच कर्जमाफीची रक्कम थेट शेतक-यांच्या कर्जखात्यामध्ये जमा केली जाणार असल्याचे ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक रत्नाकर केसकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, व्यापारी व ग्रामीण बँकांच्या मिळून २८ शाखा आहेत. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिल्ह्यात ६४ शाखा आहेत.बँक आॅफ महाराष्ट्राला जिल्ह्यातील पहिल्या ग्रीन यादीतील कर्जदार शेतकºयांसाठी ३० कोटी रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहेत. तसेच अन्य राष्ट्रीयीकृत बँका, व्यापारी बँका व मध्यवर्ती बँकेच्या विविध शाखांना कर्जमाफीस प्राप्त शेतक-यांची पहिली यादी प्राप्त झाली आहे. एकूणच जिल्ह्याला पहिल्या टप्प्यासाठी शंभर कोटी रुपये प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रात्र शेतक-यांच्या याद्या आता बँकांच्या मुख्य कार्यालयामार्फत स्थानिक शाखांना पाठविण्यात येत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त पात्र शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.दरम्यान, ज्या शेतक-यांची नावे पिवळ्या रंगाच्या यादीत आहेत, त्यांच्या कर्जमाफीकरिता सादर केलेल्या अर्जात त्रुटी असून त्या दूर कराव्या लागणार आहेत. तरच त्यांच्या नावांचा हिरव्या यादीत समावेश केला जाणार आहे. लाल रंगाच्या यादीत ज्या शेतक-यांच्या नावांचा कर्जमाफीबाबत समावेश केला गेला आहे, त्या शेतक-यांची नावे तात्पुरती नाकारली गेली आहेत. योग्य पूर्तता केली गेल्यास त्यांचा कर्जमाफीच्या पात्र यादीत समावेश होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आपले सरकार पोर्टलवर पात्र शेतक-यांची यादी इंग्रजीत आहे. या यादीत आडनावातील स्पेलिंगच्या चुका डोकेदुखी ठरत आहे आॅनलाईन कर्जमाफी अर्ज भरताना नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश जातील, असे सांगितले गेले होते. पण आता त्या मोबाईलवरील संदेशाची शेतक-यांना प्रतीक्षा आहे.
अखेर पहिली यादी प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 1:41 AM