लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : येथील तोष्णीवाल महाविद्यालयातील जप्त वाळूसाठा प्रकरणात महाविद्यालयाच्या तत्कालीन प्राचार्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच सात लाख ४९ हजार रुपये दंडाची रक्कम तात्काळ वसूल करण्याचा आदेश उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी दिला.सेनगाव येथील तोष्णीवाल महाविद्यालयात पाच वर्षांपूर्वी महसूल विभागाच्या पथकाने कारवाई करून प्रांगणातून ५५० ब्रास अनधिकृत वाळूसाठा जप्त केला होता. सदर जप्त वाळूसाठा कालांतराने गायब झाला होता. या प्रकरणात अनेक दिवसांपासून कारवाई प्रलंबित आहे. यासंर्दभात जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या सूचनेवरून उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी २८ आॅगस्ट रोजी आदेश काढून या प्रकरणात तत्कालीन प्राचार्य श्रीपाद तळणीकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच वाळूसाठा दंडाची सात लाख ४९ हजार १०० रुपयांची रक्कम वसूल करण्याचे आदेश सेनगाव तहसीलदारांना दिले आहेत. तब्बल पाच वर्षांपूर्वीच्या जुन्या प्रकरणात फौजदारी कारवाईसह मोठ्या दंडाची कारवाई उपविभागीय अधिकारी खेडेकर यांनी केल्याने वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणात अनेकदा सुनावणी झाली होती.
अखेर सेनगावातील वाळूसाठाप्रकरणी ७.४९ लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 11:52 PM