औरंगाबाद : स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील १०८ रस्त्यांची कामे लवकरच सुरू होणार आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने रस्ते कसे तयार करावेत, त्यांची गुणवत्ता तपासणीचे कामही मुंबईच्या आयआयटी संस्थेला देण्यात आले. आयआयटीचे एक पथक शहरात दाखल होणार असून, ते कामांसदर्भात अहवाल देणार आहेत. हा अहवाल प्राप्त होताच मे महिन्याच्या अखेरीस प्रत्यक्षात कामांना सुरुवात होणार आहे. स्मार्ट सिटीअंतर्गतच तीन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृहाच्या कामाला दोन दिवसांत सुरुवात होणार आहे.
स्मार्ट सिटीने शहरातील १०८ रस्त्यांच्या कामासाठी कंत्राटदार ए. जी. कन्स्ट्रक्शनची निवड केली. कंपनीला वर्क ऑर्डरसुद्धा देण्यात आली. कंत्राटदाराने रस्त्याचे ड्रोन आणि गुगल मॅपिंगद्वारे सर्वेक्षण करून मोजणी केली. या संदर्भात स्मार्ट सिटीचे प्रकल्प समन्वयक इम्रान खान यांनी सांगितले की, सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यांच्या कामांची प्रक्रिया सुरू केली. रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत यासाठी मुंबईच्या आयआयटी संस्थेची तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली असून, कंत्राटदारांनी तयार केलेली डिझाइन्स तपासणीसाठी आयआयटी मुंबईला पाठविण्यात आली आहेत. आयआयटी मुंबईचे एक पथक लवकरच रस्त्यांची पाहणी करण्यासाठी येणार आहे.
स्मार्ट सिटीमार्फत शहरात तीन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे बांधकामदेखील सुरू होईल. कंत्राटदारांनी संकल्पचित्र तयार केले आहे. त्यास मान्यता मिळालेली आहे. दोन दिवसांत सिडको एन-११ आणि आंबेडकरनगर येथील हॉस्पिटलचे काम सुरू होईल. त्यानंतर दोन हॉस्पिटलच्या कामाला सुरुवात होईल. सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहाचे नूतनीकरणही सुरू होईल.