औरंगाबाद : रात्रीच्या वेळी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची उपचारासाठी परवड होत असल्याचे सचित्र वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच घाटी रुग्णालय प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत मेडिसिन बिल्डिंग परिसरात स्ट्रेचर पॉइंट निश्चित करण्यात आला. तसेच यासाठी तीन शिफ्टमध्ये ऋत्विक जाधव, अजय बनसोडे, विक्रम डिडलोंढे या कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केली असल्याचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली.
शहरातील मयूरपार्क परिसरातील मुलाला सर्पदंश झाल्याने पालकांनी घाटीत आणले. मात्र, उपचार घेण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षाचे सचित्र वृत्त बुधवारच्या अंकात लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले. स्ट्रेचरचा अभाव, कर्मचाऱ्यांची गैरहजेरी आदी मुद्दे यातून अधोरेखित झाले होते. यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या. त्यामुळे घाटीच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली. ‘लोकमत’मधील बुधवारच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या सचित्र वृत्तामुळे अधिकारी खडबडून जागे झाले. मेडिसिन बिल्डिंगजवळ स्ट्रेचर पॉइंट निश्चित करण्यात आला. तसेच यासाठी तीन कर्मचाऱ्यांची तीन शिफ्टमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त काही कर्मचाऱ्यांना सेवेतून मुक्त का करू नये, अशा आशयाच्या नोटिसा बजावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
अधिकाऱ्यांकडून अचानक पाहणी केली जाणाररुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय दूर करण्यासाठी स्ट्रेचर पॉइंट निश्चित केला आहे. तसेच तीन कर्मचाऱ्यांची नियुक्तीही तेथे केली आहे. याशिवाय परिसरात अधिकाऱ्यांकडून अचानक पाहणीही केली जाणार आहे.- डॉ. शिवाजी सुक्रे, प्रभारी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद.