छत्रपती संभाजीनगर : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील कथित घोटाळ्याप्रकरणी अंबादास मानकापे व कुटुंबीयांसह आदर्श संस्थेच्या मालमत्ता ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेसाठी सोमवारी पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि सहकार विभागाला आदेश दिल्यानंतर बुधवारी आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक मंडळ महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ७८ अ (१) मधील तरतुदीनुसार बरखास्त करण्यात आले. संस्थेवर प्रशासक समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा विशेष लेखा परीक्षक एस.पी. काकडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती असून, सहायक निबंधक सहकारी संस्था खुलताबाद व्ही. पी. रोडगे व कन्नडचे व्ही. व्ही. थोटे हे समितीचे सदस्य आहेत. गुरुवारपासून समिती पदभार घेऊन कामकाज सुरू करणार आहे.मालमत्ता जप्तीची प्रक्रिया मोठी असून, प्रशासक नेमल्यामुळे याला गती येणार आहे. सहकार कायद्यानुसार ‘आदर्श’चे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून, पुढील तीन महिन्यांत पूर्ण व्यवहार, कर्जवाटप, कर्जवसुलीचे परीक्षण संचालक समिती करील. तर दुसरीकडे पोलिस न्यायालयात आरोपपत्र दाखल करतील. न्यायालयाच्या आदेशानंतर मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू होईल. ७ ऑगस्ट रोजी सहकार आयुक्त आढावा घेणार आहेत. न्यायालयीन प्रक्रियेच्या प्राथमिक तयारीला ३ महिने लागण्याचा अंदाज आहे.
ठेवीदार आणि कर्जवाटप असे...एकूण ठेवीदार ६३,७२० आहेत. २५ हजार रुपयांपर्यंत ठेवी असलेल्या खातेदारांची संख्या ४४ हजार आहे. १९,७२० ठेवीदारांच्या मोठ्या रकमा आहेत. ३५६ कोटी रुपयांच्या ठेवी असून, त्यापैकी २४६ कोटींचे कर्ज वाटप केलेले आहे. विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्यात आल्यानंतर शासनाने नेमलेली प्रशासकीय समिती सर्वंकष बाबी तपासून अहवाल तयार करील.