औरंगाबाद : केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिल्लीत महाराष्ट्रातील रस्ते विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. या बैठकीत चिकलठाणा ते वाळूज ओव्हरब्रिजच्या (उड्डाणपूल) डीपीआरचे सादरीकरण गडकरी यांच्यासमोर करण्यात आले. ओव्हरब्रिजचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) गडकरी यांनी पाहिल्यानंतर ते काम लवकर पूर्ण करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
नवी दिल्लीतील संसद भवनमधील ग्रंथालय गडकरी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यातील रस्ते विकासाच्या कामासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय झाले. शहरातील चिकलठाणा ते वाळूज ओव्हरब्रिजसंदर्भात तातडीने तयार केलेल्या डीपीआरचे प्रेझेंटेशन गडकरींसमोर करण्यात आले. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, खा. इम्तियाज जलील यांच्यासह राज्यातील सर्वपक्षीय खासदारांची बैठकीला उपस्थिती हाेती.
जिल्ह्यातील विविध रस्ते विकासांची कामे गडकरी यांनी लवकर पूर्ण करण्याचा आदेश दिला. त्यानंतर औरंगाबाद ते पैठण या महामार्गाचे टेंडर अंतिम टप्प्यात आले असल्याचे एनएचएआयने सांगितले. वारंवार वाहतुकीची कोंडी होत असलेल्या नगर नाका, माळीवाडा, दौलताबाद टी पॉइंट ते दौलताबाद महामार्ग चार पदरी करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा बैठकीत झाली.
औरंगाबाद ते पुणे मार्गाचा डीपीआर तयार करामध्यंतरी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी औरंगाबाद ते पुणे या नवीन महामार्गाची घोषणा केली होती. त्यासंदर्भात राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना औरंगाबाद ते पुणे या नवीन रस्ते मार्गाचा डीपीआर तत्काळ पूर्ण करण्यासंदर्भात या बैठकीत निर्देश दिले. औरंगाबाद ते पुणे हा महामार्ग दोन्ही शहरांच्या औद्योगिक विकासांना पूरक राहणार आहे. औद्योगिक आणि सांस्कृतिक राजधानी या नवीन महामार्गाने जोडण्यात येणार आहे. हा महामार्ग दोन्ही शहरांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासामध्ये महत्त्वपूर्ण भर घालणारा असेल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.