औरंगाबाद : एसटी महामंडळातील महिला कर्मचार्यांना हक्काच्या प्रसूती रजेबरोबरच बाळाच्या संगोपनासाठी ३ महिने अतिरिक्त पगारी रजा देण्याची घोषणा परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आॅगस्टमध्ये केली. याच्या अंमलबजावणीचे परिपत्रक शुक्रवारी (दि. २३ ) महामंडळाने काढले असून आता त्याची अंमलबजावणी होणार आहे. याबाबत 'लोकमत' ने सातत्याने वृत्त प्रसिद्ध करून पाठपुरावा केला होता.
एसटी महामंडळातील राज्यभरात काही महिला वाहकांचे अचानक गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’ने १४ जुलै रोजी समोर आणताच एकच खळबळ उडाली. याविषयी तीव्र पडसाद उमटले. याविषयी ‘लोकमत’ने सतत पाठपुरावा केला. अखेर एसटी महामंडळातील हजारो महिला कर्मचार्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला. गणेशोत्सव काळातील सुरू असलेल्या फेर्यांचा आढावा घेण्यासाठी दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली आॅगस्टमध्ये वरिष्ठ अधिकार्यांची बैठक झाली. त्यात महिला कर्मचार्यांच्या प्रसूती रजेचा मुद्दा उपस्थित झाला. यावेळी महिला कर्मचार्यांना बाळाच्या संगोपनासाठी तीन महिने रजा देण्याचा निर्णय परिवहन मंत्र्यांनी जाहीर केला.
सात महिन्यांनी निघाले परिपत्रकसध्या महिला कर्मचार्यांना २६ आठवडे प्रसूती रजा दिली जाते. बहुतांश महिला मुलाच्या जन्मानंतर संगोपनासाठी ही रजा घेतात. काही महिलांना प्रसूतीपूर्व विश्रांतीची आवश्यकता असते. यामुळे नियमित रजेबरोबर अतिरिक्त तीन महिन्यांची रजा मंजूर करण्यात आल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली होती. यानंतर तब्बल सात महिन्यांनी या नव्या निर्णयाच्या अंमलबजावणी करण्याचे परिपत्रक एसटी महामंडळाकडून काढण्यात आले आहे. या नव्या निर्णयाच्या परिपत्रकाचे महिला वाहकांनी स्वागत केले असून या पुढे गरोदरपणातील त्रास कमी होईल अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
सर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी अंमलबजावणी व्हावीअतिरिक्त रजेची घोषणा होऊन आता त्याच्या अंमलबजावणीचे परिपत्रक निघाले आहे याचे आम्ही स्वागत करतो. या निर्णयाच्या अंमलबजावणीने राज्यभरातील सर्व महिला वाहकांना फायदा होईल. यासोबतच आता या निर्णयाची अंमलबजावणी सर्वच महिला कर्मचाऱ्यांसाठी व्हावी असे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या राज्य महिला संघटक शीला नाईकवाडे म्हणाल्या.