लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाडा विकास मंडळाच्या बैठकीला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ठेंगा दाखविला. सकाळपासून सदस्यांनी मराठवाड्यातील अनुशेषाबाबत परिपूर्ण प्रस्ताव तयार केला होता. त्यावर सायंकाळी ७ वा. अर्थमंत्र्यांशी सर्व सदस्य बोलणार होते; परंतु अर्थमंत्र्यांमार्फत बैठक रद्द केल्याचा निरोप सदस्यांना गेल्यानंतर निराश होऊन त्यांनी विकास मंडळाचे कार्यालय सोडून घर गाठले. ९ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून, त्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याच्या अनुशेषासाठी करण्यात आलेला मसुदा कार्यालयातील कर्मचा-यामार्फत आयुक्तांकडे सोपविण्यात आला. हा मसुदा स्वीकारण्यासाठीदेखील अर्थमंत्र्यांनी वेळ दिला नाही.राज्यपाल नियुक्त सदस्य मंडळावर आहेत. त्यामुळे त्यांचे मत किमान अर्थमंत्र्यांनी जाणून घ्यावे, यासाठी विभागीय आयुक्तांमार्फत वेळ घेऊन बैठकीची वेळ निश्चित करण्यात आली होती. सोमवारी तज्ज्ञ सदस्य शंकर नागरे, कृष्णा लव्हेकर, मुकुंद कुलकर्णी, बी.बी. ठोंबरे यांनी बैठकीच्या अनुषंगाने मराठवाड्यातील अनुशेषाबाबत सर्वंकष मसुदा तयार केला; परंतु ऐनवेळी बैठक रद्द झाल्याचा निरोप त्यांना देण्यात आला. दरम्यान, अर्थमंत्री मुनगंटीवार म्हणाले, सदस्य मंडळासोबत बैठक होती, याची मला काहीही माहिती नव्हती.
विकास मंडळाच्या बैठकीला अर्थमंत्र्यांचा ठेंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 1:11 AM