लाडसावंगी : गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीने सर्वच क्षेत्रावर विपरीत परिणाम केला आहे. यात लाडसावंगी ग्रामपंचायतदेखील सुटली नाही. कोरोनाच्या सावटाने अनेकांच्या नोकऱ्या, कामधंदे हिसकावले गेल्याने नागरिक ग्रामपंचायतीला कर देण्यास असक्षम आहेत. परिणामी करवसुली थांबल्याने ग्रामपंचायतीचा कारभार अडचणीत आला आहे. ‘आमदनी अठण्णी, खर्चा रुपय्या’ अशी म्हणण्याची वेळ ग्रामपंचायतीवर येऊन ठेपली आहे, तर नवीन विकासकामांनादेखील ब्रेक लागला आहे.
औरंगाबाद तालुक्यातील लाडसावंगी हे गाव वीस हजार लोकवस्तीचे आहे. सतरा सदस्य असलेल्या येथील ग्रामपंचायतीला गेल्या १४ महिन्यांपासून कोरोना महामारीचा सामना करावा लागत आहे. गावात भरणारी बाजारपेठ बंद झाली आहे. शेती हंगामातील खरेदी-विक्री बंद झाल्याने आर्थिक व्यवहार थांबले आहेत. त्यामुळे नागरिकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. स्थानिक करातून मिळणारे उत्पन्न बंद झाल्याने ग्रामपंचायतीची वाईट अवस्था झाली आहे. वसुली नाही, तर कर्मचाऱ्यांना पगारदेखील नाही.
गावाला तीन विहिरींतून पाणीपुरवठा केला जातो. यात गावातील व बाबूवाडी धरणाखालील पाइपलाइन सतत नादुरुस्त होते. तीन विहिरींचा विद्युतपंपाचा खर्च आवाक्याबाहेर गेला. नागरिकांना उत्पन्न नसल्याने कोणीही कर भरणा करीत नाही. त्यात ग्रामपंचायतीत दहा कर्मचारी कामाला आहेत. त्यांचा पगार थकला आहे. आठवडी बाजार बंद असल्याने वर्षाकाठी पाच लाखांचा बाजारातून मिळणारा करदेखील बंद झाला आहे, तर तेराव्या व चौदाव्या वित्त आयोगाचा पैसा केवळ नवीन कामांसाठीच खर्च करता येतो. ग्रामपंचायतीसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
कोट
लाडसावंगी गाव मोठे असल्याने पाइपलाइन दुरुस्ती, विद्युत पंप दुरुस्ती उधारीवर करून गावाचा पाणीपुरवठा सुरळीत केला आहे. करातून मिळणारे उत्पन्न बंद झाल्याने कर्मचाऱ्यांचा पगार कसा करायचा असा प्रश्न आहे.
-सुदाम पवार, सरपंच, लाडसावंगी
गावकरी पाणीपट्टी, घरपट्टी देण्यासाठी तयार होत नाहीत. करवसुलीला पथक गेले तर हाताला काम नाही, मग पैसा द्यायचा तरी कोठून, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पैसे आल्यावर नक्की भरू, असे आश्वासन गावकरी देत आहेत.
- बी. एस. मुकाडे, ग्रामविकास अधिकारी.