गंगापूर : खोटा व बनावट दस्तावेज खरा असल्याचे भासवीत गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांची फसवणूक केल्याप्रकरणी गंगापूर कारखान्याचे चेअरमन तथा आमदार प्रशांत बंब यांच्यासह १६ जणांविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. बंब यांनी १५ कोटी ७५ लाख ३३ हजार ३३८ रुपये हडप करून फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी कृष्णा पाटील डोणगावकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गंगापूर सहकारी साखर कारखाना २००७-२००८ पासून बंद आहे. राज्य सहकारी बँकेने कर्जवसुलीपोटी कारखाना जप्त केला. संबंधित बँकेने कारखाना विक्रीसाठी काढल्यानंतर तत्कालीन संचालक मंडळाने या विक्री व्यवहाराच्या विरोधात न्यायालयीन कारवाई सुरू केली होती. त्या न्यायालयीन कारवाईत न्यायालयात गंगापूर कारखान्याच्या वतीने ९ कोटी रुपये जमा करण्यात आले होते. न्यायालयाने ती रक्कम कारखान्यास परत केली असून, आजपर्यंत ती रक्कम व्याजासह १५ कोटी ७५ लाख ३३ हजार ३३८ रुपये एवढी झाली आहे. संबंधित रक्कम ७ नोव्हेंबर २०२० रोजी कारखान्यास परत मिळाली होती.
कारखान्याचे चेअरमन आ. बंब व प्रभारी कार्यकारी संचालक बी. एम. पाटील यांनी संगनमताने २० जुलै २०२० रोजी बेकायदेशीररीत्या कारखान्याचे खाते उघडले. खाते उघडण्यासाठी कारखान्याने ठराव घेतला होता, तो ठरावदेखील बनावट व बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. खाते उघडत असताना कारखाना ही पार्टनरशिप फर्म असल्याचे दाखविण्यात आले व त्यात आ. बंब आणि पाटील हे पार्टनर आहेत अशा प्रकारचा खोटा दस्तावेज निवडला. नागरी सहकारी बँकेत खाते उघडताना सक्षम अधिकाऱ्याची कुठलीही परवानगी घेतली नाही. मिळालेल्या रकमेतून विविध ठिकाणी नावे रक्कम टाकण्यात आली. वास्तविक कारखाना ही वित्तीय संस्था नसल्याने ती व्याज वाटू शकत नाही. व्याज देण्याच्या नावाखाली अधिकची दिली जाणारी रक्कम अपहार करण्यासाठी बेकायदेशीरपणे दिली जात असल्याच्या फिर्यादीवरून बंब यांच्यासह १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.