छत्रपती संभाजीनगर : गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुल ते शहानूरमियाँ दर्गा चौक रस्त्यावरील ‘इंडो स्टार फायनान्स’च्या कार्यालयास शॉर्टसर्किटमुळे शुक्रवारी रात्री आग लागली. कार्यालयातून धूर निघत असल्याचे गस्तीवरील पोलिसांना दिसताच त्यांनी अग्निशामक दलाला कळविले. लवकर आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला.
शुक्रवारी रात्री १०:३० ते ११:०० वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह शहरात रिमझिम पावसाच्या सरी कोसळू लागल्या. यावेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण शहरात अंधार पसरला होता. यानंतर बराच वेळ विजेचा लपंडाव सुरू होता. गस्तीवर असलेल्या जवाहरनगर पोलिसांना विभागीय क्रीडा संकुल ते दर्गाचौक रस्त्यावरील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यातून धूर येत असल्याचे दिसले. या घटनेची माहिती त्यांंनी पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. पोलिसांनी अग्निशामक दलाला घटनास्थळी पाचारण केले. अवघ्या काही मिनिटांत अग्निशमनचे चार बंब आले.
जवानांनी पाणी मारून अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविले. तोपर्यंत कार्यालयातील फर्निचर आणि अन्य साहित्य, कागदपत्रे जळाली होती. पोलिसांनी सतर्कता दाखविल्याने मोठा अनर्थ टळला. या इमारतीच्या तळमजल्यावर सीसीडी, तर पहिल्या मजल्यावर जावेद हबीब सलून अकॅडमी आहे. शिवाय लगतच पोद्दार शाळा आहे. ही आग भडकली असती, तर मोठे नुकसान झाले असते, अशी माहिती जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली.