राज्य सरकारच्या निर्देशानुसार मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी शहरातील सर्व रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी एक स्वतंत्र पथक नेमले आहे. रुग्णालयात आगीच्या घटना रोखण्यासाठी यंत्रणा सक्षम आहे का, याची तपासणी हे पथक करत आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ५६ रुग्णालयांची तपासणी केली जाणार आहे. सोमवारपासून तपासणीस सुरुवात झाली. शहरातील पाच रुग्णालयांची मंगळवारी तपासणी करण्यात आली. यातील तीन रुग्णालयांत सुसज्ज यंत्रणा कार्यान्वित असून, कर्मचाऱ्यांना यंत्रणा हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. दोन रुग्णालयांत उपकरणे बसविण्यात आली आहे. त्यामध्ये आणखी वाढ करण्याची गरज असून, कर्मचाऱ्यांना उपकरणे हाताळण्याचे प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. संबंधित रुग्णालयांना प्रशिक्षणासाठी अग्निशमन विभागाला पत्र पाठविण्याची सूचना पथकाने केली. पत्र प्राप्त होताच संबंधित रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती आर. के. सुरे यांनी दिली.
या रुग्णालयांची तपासणी
पथकाने कमलनयन बजाज हॉस्पिटल कोविड सेंटर, सीएसएम हॉस्पिटल कोविड सेंटर, लाइफ हॉस्पिटल कोविड सेंटर, गोल्डनसिटी हॉस्पिटल कोविड सेंटर, अल्पाइन हॉस्पिटल या रुग्णालयांची तपासणी केली. या रुग्णालयांत प्राथमिक उपाययोजना करता येतील, अशी व्यवस्था असल्याचे सुरे यांनी स्पष्ट केले.