छत्रपती संभाजीनगर : शहरात जमिनींचे दर आकाशाला गवसणी घालत आहेत. टोलेजंग इमारती उभारण्यात येत आहेत. मोठ्या इमारतींमध्ये आग लागल्यानंतर ती त्वरित शमवण्यासाठी नियमानुसार सर्व यंत्रणा आहे का? हे तपासण्याचे काम अग्निशमन विभागाचे आहे. महापालिकेचा अग्निशमन विभाग खासगी एजन्सी तपासण्या करतात, असे सांगून मोकळे होतो. त्यामुळे प्रशासक जी. श्रीकांत यांनी माेठ्या इमारतींचे फायर ऑडिट करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली.
मुंबईच्या गोरेगाव पश्चिम उपनगरातील उन्नतनगर येथे ७ मजली इमारतीला तीन दिवसांपूर्वी आग लागली. या आगीत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. अनेक जण भाजले. या घटनेमुळे टोलेजंग इमारतींच्या फायर ऑडिटचा मुद्दा ऐरणीवर आला. पत्रकारांनी मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांना शहरातील मोठ्या इमारतींची स्थिती आणि शाळा, महाविद्यालयांमधील अग्निशमन सर्वेक्षणाचे काय झाले, असा प्रश्न केला. समोर निवृत्त अग्निशमन अधिकारी बसलेले होते. त्यांना प्रशासकांनी प्रश्न केला. त्यांनी उत्तर दिले की, फायर ऑडिट खासगी नेमलेल्या संस्था करतात. या उत्तरावर प्रशासक अधिकच भडकले. निवृत्त अधिकाऱ्यांवर काहीच जिम्मेदारी ठेवता येत नाही. उद्या एखादी मोठी दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण? कोणतीही सबब न सांगता त्वरित फायर ऑडिट करा, असे निर्देश त्यांनी दिले.
शहरात अनेक मोठ्या घटनाशहरात यापूर्वी आगीच्या अनेक मोठ्या घटना घडलेल्या आहेत. औरंगपुरा जि. प. मैदानावरील फटका मार्केट आग प्रकरण, मोठमोठ्या इमारतींना आग लागली. आग शमवण्यासाठी मनपाकडे मोठी शिडीसुद्धा नाही; पण नगररचना विभागाकडून मोठमोठ्या इमारतींसाठी बांधकाम परवानग्या देण्यात येत आहेत.
पाच हजारांहून अधिक मोठ्या इमारतीशहर, परिसरात उंच इमारती बांधण्यावर अधिक भर देण्यात येतोय. शहरात तीन ते चार मजले अनेक नागरिक उभारत आहेत. बांधकाम व्यावसायिक ७ मजल्यांहून अधिक उंच इमारती बांधण्यावर भर देताना देत आहेत. पाच मजलींपेक्षा उंच इमारतींची संख्या जवळपास ५ हजारांहून अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.