वाळूज महानगर (औरंगाबाद ) : वाळूज एमआयडीसीतील कारखान्यांमध्ये फायर ऑडिट होत नसल्याचे अनेक घटनांवरून दिसून येत आहे. गत पाच महिन्यांत आगीच्या २४ घटना घडल्या आहेत. यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, एकाचा बळी गेला आहे. अग्निशमन सुरक्षेविषयी एमआयडीसी उदासीन असल्याने कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वाळूज एमआयडीसीतील कारखान्यात आगीच्या घटना थांबविण्यासाठी कोणतीच ठोस उपाययोजना केली जात नसल्याने आगीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. कारखान्यांमध्ये अग्निशमन नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे. वारंवार आगीच्या घटना घडूनही एमआयडीसी याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. एमआयडीसीत ४ हजारांवर कारखाने असून, यामध्ये हजारो कामगार काम करतात.
बहुतांश कारखान्यांत स्वत:ची अग्निशमन यंत्रणा नसल्याचे उघडकीस आले आहे, तर काही कारखान्यांत अग्निशामक यंत्रणा बसविण्यात आलेली आहे; परंतु ती कार्यान्वित नाही. एमआयडीसी अग्निशमन कार्यालयाकडून फायर आॅडिटच झाले नसल्याचे वाढत्या आगीच्या घटनांवरून दिसून येते, तर अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित आहे अथवा नाही हे तपासणीचे अधिकार एमआयडीसी अग्निशामक दलाला नाहीत. त्यामुळे आगीच्या घटना वाढत आहे.
एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता रवींद्र कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही, तर वाळूज एमआयडीसी अग्निशमन अधिकारी के.ए.डोंगरे यांनी वाळूज कार्यालयातून कोणतीच परवानगी दिली जात नाही. ती शेंद्रा कार्यालयातून दिली जाते, असे लोकमतशी बोलताना सांगितले.
भंगार गोदामाला आग लाखोंचे नुकसानचालू वर्षात पहिल्या ५ महिन्यांतच एमआयडीसीत आगीच्या २४ घटना घडल्या आहेत. यात एका वयोवृद्ध इसमाचा मृत्यू झाला असून, अनेक कुटुंब बचावली आहेत, तर कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. १२ जानेवारीला अभिजित पाटणी यांच्या प्लॉट क्रमांक सी-२८२ वरील भंगार गोदामाला भीषण आग लागून लाखोंचे नुकसान झाले.
२४ जानेवारीला धनराज चव्हाण व इंद्रजित राऊत यांच्या प्रिंटिंग प्रेसला आग लागली. १५ फेब्रुवारी रोजी प्रकाश विजयवर्गीय यांच्या प्लास्टिक कंपनीला आग लागून वृद्धाचा होरपळून मृत्यू झाला, तर लाखो रुपयांचे नुकसान झाले. १६ फेब्रुवारीला बी-७६/२ वरील अभय एजन्सीच्या आॅईल टँकला आग लागली. ११ एप्रिलला सय्यद सलमान सय्यद रहेमान यांच्या भंगार गोदामाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. १६ मे ला बनकरवाडी गट नंबर ४१ वरील केदारनाथ पॅकिंग कंपनीला आग लागून लाखो रुपयांची यंत्र सामुग्री व पक्का आणि कच्चा माल जळून खाक झाला.