औरंगाबाद: नारेगावातील फर्निचरच्या दुकानाला मंगळवारी सायंकाळी लागलेल्या आगीने भीषण रूप घेत अन्य तीन दुकाने जळून राख झाली. अग्निशमन दलाच्या ३ गाड्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्याने आग आटोक्यात आली.
या आगीत पत्र्याच्या शेडमधील छोट्या उद्योगाचे लाखोचे नुकसान झाले. सोफे व सुटकेस बॅग तयार करणारे दुकान, चिवडा तयार करणारी सानी फूड्स नमकिन कंपनी, बेसन तयार करणारे राज फ्लोअर मिल या तीन दुकानांना आगीने आपल्या कवेत घेतले. सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास आग लागली. पण आग कशामुळे लागली याची नेमकी माहिती कुणी देऊ शकले नाही. आगीत फरसानच्या दुकानातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग अधिकच भडकली. आगीच्या ज्वाला उंचच उंच उठत होत्या. आगीच्या लोळाने अवघा परिसर प्रकाशमय झाला. अग्निशमनच्या तीन गाड्यांनी दोन ते अडीच तास शर्थीचे परिश्रम घेऊन आग आटोक्यात आणली. परंतु तोपर्यंत दुकाने भस्मसात झाली होती.
स्थानिक नागरिकांचीही मदत...सायंकाळी काम संपल्याने दुकाने बंद करून सोफावाले घरी गेले होते. शेजारीची दुकाने बंद असल्याने आग विझविण्यासाठी अडचण आली. सोफा व सुटकेस बनविणाऱ्या दुकानात तसेच चिवडा आणि बेसन आटा दळणारी कंपनीतील तयार माल तसेच कच्चा माल आगीत भस्म झाला. सोफ्याचे प्लास्टिक व ऑईलने आग आटोक्यात येत नव्हती. त्यामुळे अग्निशमन जवानांना मोठी कसरत करावी लागली.
लाखोंचे नुकसान...कर्मचारी कारखाना बंद करून निघण्याच्या तयारीतच होते, तर बाजूच्या दुकानात आग दिसली. त्यामुळे मदतीसाठी नारेगावातील नागरिक व युवकांची टीम धावली. परंतु अधिक काळ ते टिकू शकले नाहीत. तयार माल व कच्चा माल, पॅकिंगसाठी लागणारे साहित्य तसेच मशिनरी, शेडचे मोठे नुकसान झाल्याचे सानी फूड्स नमकिनचे शेख हारुण शेख रसूल यांनी सांगितले.आगीची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक़ आबुज कर्मचाऱ्यासह घटनास्थळी पोहोचल्या. आग कशामुळे लागली हे समोर आले नाही. नुकसान भरपूर झाले असले तरी व्यावसायिकांनी नुकसानीचा आकडा सांगितलेला नाही. तो आल्यावर सांगता येईल, असे पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी सांगितले.