छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात असलेल्या एका शस्त्रगृहात ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या यंत्रणेत बिघाड होऊन शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. वेळीच कर्मचाऱ्यांनी धाव घेतल्याने आगीवर नियंत्रण मिळाले आणि मोठी घटना टळली.
प्रसूतीशास्त्र विभागाच्या अंतर्गत असलेल्या शस्त्रगृहात ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला असलेल्या पॅनलला आग लागल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. अग्निशमन बंबाच्या मदतीने त्यांनी या आगीवर वेळीच नियंत्रण मिळवले.
घटनेची माहिती मिळताच अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आढावा घेतला.