वाळूज महानगर : घाणेगाव शिवारातील खाजगी गट नंबरमध्ये असलेल्या मॅग इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीला शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीत कंपनीतील तयार झालेले बल्ब, कच्चा माल तसेच मशिनरी जळाली.
शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कंपनीच्या शेडमधून धुराचे लोळ बाहेर येत असल्याने शेड मालक निलेश मुंडे यांनी कंपनीचे मालक प्रवीण माने यांच्याशी संपर्क साधून या आगीची माहिती दिली. माने यांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली; मात्र अग्निशमनची गाडी लवकर न आल्यामुळे माने यांनी खाजगी टँकरच्या मदतीने कंपनीला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्र रुप धारण केल्याने कंपनीच्या शेडमधील तयार साहित्य, कच्चा माल व मशिनरी भस्मसात झाल्या. आग विझल्यानंतर वाळूज अग्निशमन विभागाची गाडी आल्याचा आरोप माने यांनी केला आहे.
आगीत ३० ते ४० लाखाचे नुकसान
आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र आगीमध्ये मोठे नुकसान झाल्याचा दावा कंपनी मालकाने केला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद नसल्याचे सांगण्यात आले.
फोटो ओळ- कंपनीला लागलेल्या आगीत शेडचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे.