वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव फाट्यालगत बंद पडलेल्या नेक्टर स्टील कंपनीत सोमवारी दुपारी अचानक आग लागली. सुदैवान यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. मात्र, कंपनीतील रॉ मटेरियल जळून खाक झाले आहे.
वाळूज औद्योगिक क्षेत्रातील ई सेक्टरमध्ये प्लॉट नंबर ६२ वर महावीर शेट्टी यांची सेक्टर स्टील नावाची कंपनी आहे. ही कंपनी काही दिवसांपासून बंद असून, ती नुकतीच मराठवाडा अॅटो या कंपनीला भाडे तत्वावर दिली आहे.
त्यामुळे सध्या कंपनीत पाडकाम व दुरुस्ती करण्यात येत असल्याने साहित्य स्थलांतरित केले जात आहे. यामुळे कंपनीतील रॉ मटेरियल ठेवले आहे. याच ठिकाणी केमिकल मिश्रीत कचरा व थर्माकोलही ठेवले आहे.
सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास या कचऱ्याला अचानक आग लागली. कंपनीतून धूर निघत असल्याने कामगारांनी पाहिले. त्यांनी माती टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण आगीने रौद्ररुप धारण केल्याने कामगारांनी ही बाब मालकाला कळविली. त्यांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे व अग्निशमन केंद्राला याची माहिती देत कंपनीत धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याच्या मारा करीत आग विझविली. आगीचे कारण समजू शकले नाही. आगीत कंपनीतील रॉ मटेरियलसह लगतची काही झाडेही जळाली आहेत.
मोठी दुर्घटना टळलीकंपनी जवळून उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेलेली आहे. आगीमुळे विद्युत वाहिनी तुटली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. अग्निशमन जवानांनी वेळीच आग विझविल्याने विद्युत वाहिनीला झळ पोहचली नाही.