उस्मानाबाद : हॉटेलला लागलेल्या आगीत झालेल्या नुकसानीपोटी विमा कंपनीने संबंधित हॉटेल मालकास साठ हजार रुपये तसेच तक्रार खर्चापोटी पाच हजार रुपये देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिले आहेत.याबाबत अॅड. प्रशांत कस्तुरे यांनी सांगितले की, शहरातील राधिका परमिट रूम व बिअरबारला १६ जानेवारी २०१३ रोजी पहाटे २ ते ३ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. यात हॉटेलमधील संपूर्ण फर्निचर, फॅन, वायरिंग, मद्याचे बॉक्स आदी जळून खाक झाले. ही आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, हॉटेलचे मालक विक्रम शिंदे यांनी सदर हॉटेलचा व्यावसायिक जोखीम विमा युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे उतरविला होता. त्यामुळे या घटनेनंतर विमा कंपनीने घटनास्थळाची पाहणी करून शिंदे यांना केवळ १८ हजार ८१२ रुपये नुकसान भरपाई मंजूर केली. शिंदे यांनी सदरची तोकडी रक्कम घेण्यास नकार देवून अॅड. प्रशांत कस्तुरे यांच्यामार्फत जिल्हा ग्राहक मंचात विमा कंपनीविरोधात धाव घेतली. या प्रकरणात शिंदे यांच्या वतीने अॅड. प्रशांत कस्तुरे यांनी बाजू मांडली. यात सदर विमा कंपनीने शिंदे यांना नुकसानीपोटी साठ हजार रुपये तीस दिवसांच्या आत द्यावेत. तसेच तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रुपये देण्याचे आदेश मंचाने दिले.
आगीमुळे नुकसान; भरपाई देण्याचे आदेश
By admin | Published: March 11, 2016 1:01 AM