रिॲलिटी चेक-
अग्निशमन विभाग कार्यालय रात्री १.००
मुजीब देवणीकर
औरंगाबाद : महापालिकेचा कारभार औरंगाबादकरांना सर्वश्रुत आहेच. मात्र, अग्निशमन विभाग नेहमी अलर्ट असल्याची प्रचीती अनेकदा सर्वांनाच आलेली आहे. ‘लोकमत’ने शनिवारी रात्री पदमपुरा अग्निशमन कार्यालयात रिॲलिटी चेक केली असता कर्मचारी जागे होते. कॉल येताच अवघ्या दोनच मिनिटांमध्ये कर्मचारी घटनास्थळी जातील, यादृष्टीने दोन पाण्याचे बंबही तयार होते. मंगळवारी ७ सप्टेंबर रोजी शहरात पावसाने दाणादाण उडविली असता अग्निशमन विभागाचे कर्मचारी सर्व ठिकाणी मदतीला धावून गेले होते.
मराठवाड्याच्या डिझास्टर मॅनेजमेंटची जबाबदारी राज्य शासनाने महापालिकेच्या अग्निशमन विभागावर सोपविली आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत अग्निशमन विभागाला इतर जिल्ह्यांमध्येही जाऊन काम करावे लागते. सध्या पावसाळा असल्याने पुरात वाहून गेल्याचे कॉल सर्वाधिक येत असतात. बाहेरगावी एक वाहन पाठवावे लागते. वाहनासोबत कुशल कर्मचारी पाठवावे लागतात. शहरात कोणत्याही क्षणी काॅल आला, तर अग्निशमन विभागाला अलर्ट राहावेच लागते. शनिवारी रात्री ‘लोकमत’ने पडताळणी केली असता सर्व कर्मचारी प्रामाणिकपणे अलर्ट मोडवर असल्याचे दिसून आले.
तयार स्थितीत दोन बंब
रात्री १२ वाजेनंतर शहरात आणि इतर जिल्ह्यांमध्ये छोटी-मोठी घटना घडली, तर सर्वांत अगोदर अग्निशमन विभागालाच धाव घ्यावी लागते. पावसाळ्यात आग लागल्याच्या घटना क्वचितच घडतात. पाऊस झाल्यानंतर अनेक सखल भागांतील वसाहतींमध्ये पाणी शिरण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे दोन पाण्याचे बंब, पाण्याच्या उपसा करणाऱ्या मोटारी, मोठी शिडी आदी सर्व साहित्यांसह वाहन उभे होते. सिडको येथील कार्यालयातही अशाच पद्धतीने वाहने अलर्ट मोडवर असतात, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
पीबीएक्सवर येतो पहिला कॉल
अग्निशमन विभागाचे दूरध्वनी क्रमांक नागरिकांना देण्यात आले आहेत. काही घटना घडल्यास नागरिक पीबीएक्सवर फोन करतात. २४ तास येथे कायमस्वरूपी, कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली असते. कॉल उचलला नाही, असे कधीच होत नाही. रात्रीही डोळ्यात तेल घालून कर्मचारी जागे असतात. येथे झोपण्याची अजिबात सोय नाही. शेजारी कोरोना सेंटर असल्याने रात्रीही वर्दळ कायम असते.
नियम काय सांगतो
अग्निशमन विभागाला एखाद्या घटनेची माहिती नागरिकांनी दिल्यानंतर त्वरित वाहन पाठविणे हा नियम आहे. एखाद्या ठिकाणी वाहन गेलेले असेल तर ते वाहन परत आल्याशिवाय दुसरीकडे वाहन पाठविता येत नाही. पदमपुरा येथे ३, चिकलठाणा येथे १, तर सिडकोत एक वाहन २४ तास अलर्ट असते. मोठी घटना असल्यास दोन्ही केंद्रांवरील वाहनेही त्या ठिकाणी बोलावून घेण्यात येतात.
२४ तास कर्मचारी सतर्क
अग्निशमन विभागात रात्री कर्मचाऱ्यांना झोपता येत नाही. कर्मचारी बसून असतात, पण कधीच झोपत नाहीत. रात्री १२ वाजेनंतर अनेकदा अधिक कॉल असतात. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी २४ तास सतर्कच असतात.
आर. के. सुरे, अग्निमशन अधिकारी, मनपा