वाळूज महानगर : उद्योगनगरीतील डम्पिंग ग्राऊंडला आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. सोमवारी दुपारी पुन्हा डंपीग ग्राऊंडला आग लागल्याने परिसरात धुराचे लोळ पसरले होते. आग विझविण्यासाठी कोणीच समोर येत नसल्याने बराचवेळ आग सुरु होती. आगीमुळे प्रदूषणात वाढ होत असून लगतच्या उद्योगांना आग लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. याविषयी वारंवार तक्रारी करुनही एमआयडीसी प्रशासन यावर काहीच उपाय करीत नसल्याने उद्योजकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
वाळूज औद्योगिक क्षेत्रातील एमआयडीसीच्या एसटीपी प्लाण्टलगत असलेल्या मोकळ्या भूखंडावर बजाजनगरसह परिसरातील कचरा आणून टाकला जातो. त्यामुळे हा भूखंड अघोषित डम्पिंग ग्राऊंड बनला आहे. परिसरातील ग्रामपंचायतीसह उद्योगनगरीतील भंगार विक्रेते व विविध व्यवसायिक या ठिकाणी कचरा टाकतात. कचरा जागेवरच सडत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला अचानक आग लागली. हवेमुळे कचऱ्याने पेट घेतला. त्यामुळे काही वेळातच आगीचा मोठा भडका उडाला. बराच वेळ आग सुरु असतानाही आग विझविण्यासाठी कोणी समोर आले नाही. त्यामुळे उशिरापर्यंत आग सुरुच होती. दरम्यान, डम्पिंग ग्राऊंडवरील कचºयाला सतत आग लागण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस प्रदूषणात वाढ होत असून उद्योजक व कामगारांना धुराचा त्रास सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे या डम्पिंग ग्राऊंड लगत अनेक छोट-मोठे कारखाने आहेत. आगीचा भडका उडून एखाद्या कारखान्याला आग लागण्याची भिती व्यक्त केली जात आहे. याविषयी उद्योजकांनी अनेकवेळा एमआयडीसीकडे तक्रारी केल्या आहेत. परंतू एमआयडीसीकडून यावर काहीच उपाय केला जात नाही. डम्पिंग ग्राऊंडला सारख्या लागणाºया आगीच्या घटनांमुळे पर्यावरणाचा ºहास तर होतच आहे. परंतू एखाद्या कारखान्याला आग लागून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे वेळीच एमआयडीसीने यावर उपाय करणे गरजेचे आहे, असा सूर उद्योजकांमूधन उमटत आहे.