वाळूज महानगर: सिडकोवाळूज महानगर १ मधील बंद पडलेल्या भाजीमंडई लगत असलेच्या विद्युत डिपीला शुक्रवारी सायंकाळी अचानक आग लागली. नागरिकांनी धाव घेवून वेळीच आग विझविल्याने डीपीचे नुकसान टळले. मात्र, यात आग विझविताना दीपक दाभाडे हे किरकोळ भाजले आहेत.
सिडकोच्या बंद पडलेल्या भाजीमंडई जवळील या डिपीवरुन साईनगरातील सेक्टर ए, सेक्टर बी व सीतानगर भागाला वीजपुरवठा केला जातो. महावितरणकडून डिपीची देखभाल दुरुस्ती केली जात नसल्यामुळे डिपीला काटेरी झुडपे व वेलीचा विळखा पडला आहे. वेली थेट विद्युत तारेला चिकटल्याने या भागातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. शुक्रवारी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास अचानक मोठा आवाज होऊन डिपीला आग लागली. आग लागल्याचे दिसताच येथील रहिवाशी दीपक दाभाडे यांनी तात्काळ याची महावितरणला माहिती दिली. महावितरणचे सचिन देवरे व ज्ञानेश्वर घोडके यांनी तात्काळ वीजपुरवठा खंडित केला.
येथील दिपक दाभाडे, प्रविण पाटील, रमेश पवार, गणेश थोरात, माधव देशमुख, अक्षय मोरे आदींनी महावितरण कर्मचाऱ्यांच्या मदतीने पाणी, वाळू, झाडाच्या फांद्याच्या सहाय्याने आग विझविली. घटनेचे गांभिर्य ओळखून नागरिकांनी वेळीच आग विझविल्याने विद्युत डिपीचे होणारे मोठे नुकसान टळले आहे.
मात्र या घटनेत आग विझविताना हात भाजल्याने दिपक दाभाडे हे किरकोळ जखमी झाले आहेत. विद्युत डिपीला आग लागल्यामुळे साईनगरातील सेक्टर ए व बी आणि सीतानगर नागरी वसाहत भागाचा वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत बंद होता. दरम्यान डीपीतील न्युट्रल वायर कट झाल्याने आग लागली असावी, असा अंदाज महावितरणचे कर्मचारी सचिन देवरे यांनी व्यक्त केला आहे.