- मेहमूद शेख वाळूजमहानगर: करोडी शिवारातील दोन कंपन्यांना आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास आग लागली. यात सुदैवाने जीवितहानी टळली असून दोन्ही कंपन्यांतील मशनरी तसेच रॉ-मटेरियल आगीत भस्मसात झाले आहे. यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
करोडी शिवारातील गट नंबर ४० मध्ये अब्दुल राजीक यांची ए. आर. प्लास्टिक या नावाची कंपनी आहे. या कंपनीत प्लास्टिक मटेरियलचे रि-सायकलिंग करण्यात येते. आज पहाटे सकाळी ४ वाजेच्या सुमारास या कंपनीला अचानक आगली. हे पाहताच सुरक्षारक्षकाने आरडाओरडा करून कंपनीतील इतर कामगारांच्या मदतीने आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र कंपनीतील प्लास्टिक मटेरियलमुळे आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीची माहिती मिळताच वाळूज अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
दरम्यान, भडका उडाल्याने लगतच्या चहा-कॉफीचे पावडर बनविणाऱ्या शाम चौधरी यांच्या श्रद्धा इंटरप्रायजेस या कंपनीला देखील आगीने वेढले. मशनरी, कच्चा माल आगीत भस्मसात झाला. यावेळी वाळूज अग्निशमन दलाचे जवान व लगतच्या नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न करून सकाळी ८ वाजेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविले.
शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाजए.आर. प्लास्टिक या कंपनीला शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज कंपनी मालक अब्दुल राजीक यांनी वर्तविला आहे. या आगीत कंपनीतील मशनरी, रा- मटेरियल, फर्निचर आगीत जळाले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे अब्दुल राजीक यांनी सांगितले. तर श्रद्धा इंटरप्रायजेस या कंपनीला आगीने वेढल्याने जवळपास २ लाखांचे नुकसान झाल्याचे शाम चौधरी यांनी सांगितले.