लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील जाफरगेट जुना मोंढा रोड येथील एका एजन्सी कम गोडाऊनच्या दुकानाला शुक्रवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास आग लागली. या घटनेत दुकानातील लाखो रुपये किमतीचे साहित्य जळून खाक झाले. तर सकाळी साडेअकरा वाजता बुक्कलगुडा येथील एका घराला आग लागली. या दोन्ही घटनांवरील आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळविले.पोलिसांनी सांगितले की, जुना मोंढा रोडवर दीपक गोयल यांच्या मालकीचे अग्रवाल ट्रेडर्स हे दुकान आहे. लुब्रिकंटस्, टायर्स, बॅटरी डिस्ट्रिब्युटर म्हणून या दुकानातून व्यवहार चालतो. गोयल आणि त्यांचे कर्मचारी गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले. यानंतर रात्री पावणेचार ते चार वाजेच्या सुमारास त्यांच्या दुकानाला आग लागली. आगीची घटना समजताच नागरिक आणि गस्तीवरील पोलिसांनी अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण केले. दुकानात लुब्रिकंट आॅइल, टायर्स आणि प्लास्टिकच्या वस्तू असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. अग्निशमनच्या तीन बंबांद्वारे पाण्याचा मारा केल्यानंतर जवानांना आगीवर नियंत्रण मिळविता आले. आगीचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. घटनेतील नुकसानीचा आकडा अद्याप दुकान मालकाने सांगितला नसल्याचे अग्निशमन अधिकारी अब्दुल अजीज यांनी सांगितले.
शहरात दोन ठिकाणी आगीच्या घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 1:07 AM