जालना : टायर पंक्चर काढण्याचे काम सुरू असलेल्या एका दुकानास लागलेल्या आगीत सुमारे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले. मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास भोकरदन नाका परिसरात ही घटना घडली.जालना-औरंगाबाद मार्गावर इब्राहिमखान हफीज खान यांचे टायर पंक्चर काढण्याचे दुकान आहे. या दुकानाला सायंकाळी सहा वाजता अचानक आग लागली. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. आगीत दुकानातील टायर, ट्यूब, ट्रेसिंग टायर, हवा मशीन, टायरकॉस्ट हे साहित्य जळाले. या दुकानाच्या बाजूलाच न्यू बॉम्बे बॉडी बिल्डर या दुकानात दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या एका ट्रकचेही आगीमुळे नुकसान झाले. माहिती मिळताच अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी पोहोचला. जवानांनी अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविल्याचे अग्निशमन अधिकारी ज्ञानेश्वर जाधव यांनी सांगितले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांत नोंद नव्हती.
टायर पंक्चर दुकानास आग; दीड लाखाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 11:07 PM