वाळूज महानगर ( औरंगाबाद ) : वाळूज एमआयडीसीतील विजय प्लॉस्टिक या कंपनीला आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. यात कंपनीच्या परिसरात वास्तव्यास असणार्या एका ६५ वर्षीय वृद्धाचा होरपळून मृत्यु झाला असून जवळपास २५ ते ३० लाखाचे नुकसान झाले.
या विषयी अधिक माहिती अशी की, वाळूज एमआयडीसीत प्लॉट क्रमांक डी.११ मध्ये प्रकाश विजयवर्गीय यांची विजय प्लॉस्टिक इंडस्ट्रिज या नावाची कंपनी आहे. या कंपनीत आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास आग लागल्याचे कंपनीत वास्तव्यास असणार्या रुपाली गावंडे यांना दिसून आले. त्यामुळे त्यांनी आरडा-ओरडा केला असता साखरझोपेत असलेले इतर कामगार झोपेतून जागे झाले. आग जास्तच भडकल्यामुळे त्यांनी आगीची माहिती अग्नीशामक विभाग व एमआयडीसी वाळूज पोलिसांना देऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र, कंपनीतील प्लॉस्टिकच्या मटेरियलमुळे आगीने बघता-बघता रौद्ररुप धारण केले. दरम्यान, आग आटोक्यात येत नसल्यामुळे पोलिसांनी वाळूज अग्नीशामक दलाचे दोन बंब, मनपा व बजाज आॅटो कंपनीच्या अग्नीशामक बंब व दोन टँकरला घटनास्थळी पाचारण केले.
शेजारील कारखानाही भक्ष्यस्थानी आग इतरत्र पसरुन लगतच्या दिलीप खेडकर यांच्या पीटीके आॅटो प्रेस (प्लॉट क्रमांक डी.१०) या कंपनीला आगीचा विळखा पडला. दोन्ही कंपनीतील मशनरी व इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास २५ ते ३० लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
होरपळून वृद्धाचा मृत्युविजय प्लॉस्टिक या कंपनीत काम करणारे पाच कामगारांची कुटुंबे कंपनीलगतच्या पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव्यास आहेत. कंपनीतील कार्यालयात फकीरा ठाकरे या कामगाराचे वडील श्रीराम ठाकरे (६५) हे झोपले होते. आग लागल्यानंतर कंपनीला आगीचा विळखा पडल्यामुळे इतर कामगारांनी आरडा-ओरडा करुन ठाकरे यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या पर्यंत वेळीच पोहचता न आल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला.