औरंगाबाद: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगर रचना विभागाच्या रेकॉर्ड रूमला आज सकाळी १० वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. यात नगररचना विभागाची काही महत्वाची दस्तावेज जळून खाक झाली आहेत. अग्निशमन दलाने तासाभरात आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्यावर नगररचना विभागाचे रेकॉर्ड रूम आहे. येथे सकाळी १० वाजेच्या दरम्यान धूर येताना दिसला. कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला कार्यालयातील अग्निशमन यंत्राने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग वाढत जात असल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. काही वेळातच दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. रेकॉर्ड रुमला एकच दरवाजा असल्याने खिडकीच्या काचा फोडून त्यातून पाणी मारून आग विझविण्यात आली. अग्निशमन दलास तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले.
महत्वाची दस्तावेज जळून खाक आगीत महत्वाची दस्तावेज जळून खाक झाली आहेत. तर काही दस्तावेज भिजल्याने खराब झाली आहेत. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.